Skip to content

सूर्यनमस्कार

जानेवारी 14, 2013

डॉ. श्री बालाजी तांबे

सूर्यनमस्कार हे सूर्योपासनेचे एक अंग असल्याने सकाळी, उगवत्या सूर्याकडे अभिमुख होऊन ते करायचे असतात. किती सूर्यनमस्कार केले यापेक्षा त्यातील प्रत्येक आसन, प्रत्येक स्थिती किती अचूक साधता आली, हे पाहणे महत्त्वाचे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सूर्याची शक्‍ती व ऊर्जा स्वीकारण्यासाठी तत्पर राहणे होय.

शरीर, प्राणशक्‍ती व मन अशा तिन्ही पातळ्यांवर काम करू शकेल असा, कमीत कमी वेळात करता येईल असा आणि तरीही करायला सहज सोपा असा उत्तम व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार, असे म्हटले तर ती अतिशयोक्‍ती ठरू नये.

सूर्यनमस्कार हे सूर्योपासनेचे एक अंग असल्याने सकाळी, उगवत्या सूर्याकडे अभिमुख होऊन करायचे असतात. तसेच इतर कोणत्याही व्यायामाप्रमाणे सूर्यनमस्कार अनशापोटी करणे अपेक्षित असते. संध्याकाळी सुद्धा सूर्यनमस्कार करता येतात. मात्र त्यापूर्वी कमीत कमी दोन तास तरी काहीही खाल्लेले नसावे.

सुरवातीला प्रत्येकाने आपली प्रकृती, शक्‍ती, स्टॅमिना यांचा विचार करून जमतील तेवढेच सूर्यनमस्कार घालणे चांगले. नंतर सराव होईल तसतशी संख्या वाढत जाईल आणि कमीत कमी 12 सूर्यनमस्कार घालता येतील. अनेक वर्षे नियमित सूर्यनमस्कार करणारे व उत्तम शरीरशक्‍ती असणारे लोक 12, 24, 36 असे बाराच्या पटीत सूर्यनमस्कार घालू शकतात. मात्र त्यासाठी सराव व अभ्यास फार महत्त्वाचा असतो.

किती सूर्यनमस्कार केले यापेक्षा त्यातील प्रत्येक आसन, प्रत्येक स्थिती किती अचूक साधता आली, हे पाहणे महत्त्वाचे. घाईघाईने सूर्यनमस्कार आटोपून मोकळे होण्याऐवजी त्यातील नेमकेपण अंगी बाणवणे, शारीरिक हालचालींना संयत श्‍वासाची साथ लाभण्याकडे लक्ष देणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सूर्याची शक्‍ती व ऊर्जा स्वीकारण्यासाठी तत्पर राहणे होय.

सूर्यनमस्कारातील आसने
सूर्यनमस्काराच्या बारा क्रिया कोणकोणत्या असतात व त्या कशा करायच्या असतात हे बहुतेक सर्वांना माहिती असते, मात्र संपूर्ण, सर्वांगसुंदर योग असे ज्यांना संबोधले जाते त्या सूर्यनमस्कारामध्ये कोणकोणती योगासने समाविष्ट केलेली आहेत आणि त्यांचे उपयोग काय असतात हे आपण पाहणार आहोत.

प्रणमासन ः सूर्यनमस्कारातील पहिली व शेवटची स्थिती म्हणजे “प्रणमासन’ होय. या स्थितीला समस्थिती असेही म्हटले जाते. यामुळे शरीर तसेच मन स्थिर होण्यास मदत मिळते. स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग व्हावा, शरीरबांधा नीट राहावा, यासाठीही ही स्थिती मदत करणारी असते.

हस्तउत्तानासन ः यानंतरची दुसरी तसेच शेवटून दुसरी म्हणजे अकरावी स्थिती म्हणजे “ऊर्ध्वनमस्कार’ किंवा “हस्तउत्तानासन’. यामध्ये पाठीचा कणा मागच्या बाजूला वाकत असल्याने पोटाचे स्नायू ताणले जातात. यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत मिळते, पचन सुधारते, पाठीचे स्नायू मजबूत होतात. या स्थितीमध्ये श्‍वास आत घेतला जात असल्याने खांद्याचे तसेच छातीचे स्नायू ताणले जातात, यामुळे फुप्फुसांचे स्थितिस्थापकत्व सुधारण्यास मदत मिळते.

पादहस्तासन ः तिसरी व दहावी स्थिती म्हणजे “पादहस्तासन’. यात अगोदरच्या ऊर्ध्वनमस्कारात डोक्‍याच्या वर असणारे हात श्‍वास सोडत सोडत पायाच्या दोन्ही बाजूंना जमिनीवर ठेवून डोके गुडघ्यांना लावायचे असतात. यामुळे मेंदूपर्यंत रक्‍ताभिसरण अधिक चांगल्या प्रकारे होते, प्राणशक्‍तीचा पुरवठा होतो, स्मरणशक्‍ती व आकलनशक्‍ती सुधारण्यास मदत मिळते. हृदय तसेच फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते, सायटिका वगैरे पायांच्या नसांसंबंधी त्रास होण्यास प्रतिबंध होतो, पायांची ताकद वाढते, पोट व कंबरेच्या ठिकाणची चरबी कमी होण्यास मदत मिळते. पोट व ओटीपोटावर दाब आल्याने स्त्रियांमध्ये पाळी नियमित येण्यास मदत मिळते.

अश्‍वसंचलनासन ः चवथी व नववी स्थिती म्हणजे अश्‍वसंचलनासन. यात एक पाय हातांच्या जवळ असतो, दुसरा मात्र शक्‍य तितका मागे नेलेला असतो व मान किंचित वर उंचावलेली असते. यामध्ये पायांचे स्नायू, नितंबातील स्नायू ताणले जातात त्यामुळे लवचिकता वाढण्यास मदत मिळते. यामुळे पाठीच्या कण्याची ताकद वाढते, शरीरबांधा नीट राहण्यास मदत मिळते. सायटिकामुळे वेदना होत असल्यास त्या कमी होतात. मूत्रसंस्था तसेच प्रजननसंस्थेच्या आरोग्यासाठीही ही स्थिती हितावह असते.

अधोमुखश्‍वानासन ः पाचवी व आठवी स्थिती म्हणजे “अधोमुखश्‍वानासन’. या क्रियेत श्‍वास सोडायचा असतो. कुत्रा आळस देताना ज्याप्रमाणे पाठ उंच करतो, पुढचे पाय पसरून संपूर्ण शरीराला ताण देतो, तशीच ही स्थिती दिसते. या आसनामुळे मस्तक, तसेच पायांची शक्‍ती वाढते, खांदे मजबूत होतात. त्या ठिकाणची जखडण दूर होते. पायामध्ये, पोटऱ्यांमध्ये गोळे येणे कमी होते. मेंदूला रक्‍ताचा पुरवठा अधिक प्रमाणात झाल्यामुळे डोके शांत व्हायला, ताण कमी व्हायलाही मदत मिळते.

अष्टांग नमस्कार ः सहावी स्थिती म्हणजे “अष्टांग नमस्कार’. दोन पाय, दोन गुडघे, छाती, हनुवटी व दोन हात या आठ अंगांचा जमिनीला स्पर्श होतो म्हणून या स्थितीला अष्टांग नमस्कार असे म्हणतात. अधोमुखश्‍वानासनानंतर श्‍वास सोडत सोडत कपाळ, नाकाचे अग्र, हनुवटी, छाती, पोट यांचा क्रमाक्रमाने जमिनीला स्पर्श करत दोन्ही हातांवर यायचे असते. याच्या अभ्यासाने हात व खांद्यांच्या स्नायूंना मजबुती मिळते पोटाच्या स्नायूंची ताकद वाढते.

भुजंगासन ः यानंतरची सातवी स्थिती म्हणजे “भुजंगासन’. अष्टांगनमस्कारानंतर आपोआप भुजंगासनाची स्थिती येते. यामध्ये दोन्ही हात सरळ असतात व संपूर्ण शरीराचे वजन हात व पायाच्या चवड्यांवर तोललेले असते. या आसनामध्ये श्‍वास आत घ्यायचा असतो व मान शक्‍य तितकी मागे न्यायची असते. हे आसन पाठीच्या कण्यासाठी खूप लाभदायक असते. स्लिप डिस्क होऊ नये म्हणून याचा उपयोग होतो. हे आसन करताना श्‍वास आत घ्यायचा असल्याने फुप्फुसांची क्षमता वाढण्यास मदत मिळते. मलावष्टंभ, गॅसेस वगैरे तक्रारींमध्येही हे आसन गुणकारी असते. भुजंगासनानंतर पुन्हा उलट्या क्रमाने अधोमुखश्‍वानासन, अश्‍वसंचलनासन, पादहस्तासन, हस्तउत्तानासन करत शेवटी प्रणमासन ही स्थिती येते आणि सूर्यनमस्काराचे एक आवर्तन पूर्ण होते.

जसजसा सराव होत जातो, तसतशी आसनांमधील नेमकेपण साधता येते, विशेषतः अश्‍वसंचलनासन, अष्टांगनमस्कार, उत्तानासन वगैरे आसनांना सिद्ध होण्यास नियमित अभ्यासाची गरज असते. श्‍वासाची लयबद्धता सांभाळणेसुद्धा सरावाने साध्य होते.

सूर्याची बारा नावे
सूर्याच्या नावांचे मंत्र म्हणून 12 नमस्कार करण्याची पद्धत आहे. मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, पूष, हिरण्यगर्भ, मरीची, आदित्य, सवितृ, अर्क व भास्कर ही सूर्याची बारा नावे होत. शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक पातळीवर परिणाम देणारे, सहजसोपे असे सूर्यनमस्कार प्रत्येकाने स्वक्षमतेनुसार घातले तर त्यामुळे दीर्घायुष्य, बल, शक्‍ती, तेजस्विता मिळेल यात शंका नाही.

सूर्यनमस्काराचे फायदे अनेक
नियमित सूर्यनमस्कार करण्याचे अनेक फायदे आहेत. यात प्रामुख्याने पाय, पाठ, पोट या भागातील रक्‍ताभिसरण सुधारते, स्नायूंमधील लवचिकता वाढते, पोटावर येणाऱ्या दाबामुळे पचन सुधारते. सूर्यनमस्काराचा सराव झाला की, त्यातून श्‍वासाचे नियमन आपोआप साधते, यामुळे श्‍वसनसंस्था, रक्‍ताभिसरण संस्था, चेतासंस्था या सर्व संस्थांना उत्तेजना मिळते, अंतस्रावी ग्रंथींनाही प्रेरणा मिळते. सूर्य हा ऊर्जेचा अविनाशी स्रोत आहे हे आपण जाणतो. सूर्यनमस्कारांमुळे आपल्याही शरीराला या ऊर्जेचा परिणाम मिळतो, यातूनच चैतन्याचा, उत्साहाचा लाभ होतो, कुंडलिनी शक्‍तीलाही चेतना मिळू शकते.
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: