Skip to content

भेसळ दुधाची

डिसेंबर 8, 2012
भेसळ दुधाची
अजित वंजारे
दुधात पाणी मिसळण्याचा प्रकार आपण जाणत होतोच;
पण आरोग्याला हानिकारक विषद्रव्ये मिसळून दूध विकले जात असल्याची कबुली सरकारनेच न्यायालयात दिली आहे. 

जन्माला आल्याच्या क्षणापासून लहान बाळाचे पालनपोषण आईच्या दुधापासून सुरू होते. म्हणजे जीवनाची सुरवातच दुधापासून होते. दूध हे परिपूर्ण नैसर्गिक अन्न आहे.

दुधामध्ये पाणी, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, शर्करा, क्षार, जीवनसत्त्वे, खनिजे व रोगप्रतिकारक जीवनरक्षके असतात. दुधामध्ये अंदाजे पंचाऐंशी टक्के पाण्याचे प्रमाण असते. मनुष्य दुधासाठी म्हैस, गाय, बकरी, मेंढी इत्यादी प्राण्यांवर अवलंबून असतो. म्हशीच्या दुधात स्निग्धांशाचे प्रमाण सर्वांत जास्त असते. गाईच्या दुधात स्निग्धांश कमी असला, तरी जीवनसत्त्वे विपुल असतात. स्निग्धांशाचे कण बारीक असल्यामुळे पचनास ते हलके असतात. गाईच्या दुधामध्ये कॅरोटीन नावाचे रंगद्रव्य असते. त्यामुळे गाईचे दूध किंचित पिवळसर असते. शेळीला कधीही क्षयरोगाची बाधा होत नाही, त्यामुळे शेळीचे दूध निर्जंतुक असते. त्याचप्रमाणे शेळीच्या दुधात लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते सर्व दुधामध्ये श्रेष्ठतम आहे, तसेच शेळीच्या दुधात पोषणमूल्ये मौलिक आहेत. ते पचण्यासही खूप हलके आहे.

दुधामध्ये असलेल्या स्निग्धांश व शर्करा यामुळे शरीर उत्साही होते. दुधातील क्षारांमुळे हाडे व दात बळकट होतात, रक्तवाढ होते. रोगप्रतिकारक जीवनरक्षकांमुळे रोगाची बाधा होण्यास प्रतिबंध होतो.

दूध हे पूर्णान्न आहे; पण केव्हा? जर ते उत्तम प्रतीचे असेल तरच. परंतु सध्या दूध हे भेसळीच्या विळख्यात पूर्णपणे अडकलेले आहे. दुधामध्ये पाणी, स्टार्च (पिठूळ) पदार्थ, बायकार्बोनेट, युरिया, साखर, ग्लुकोज, माल्टोडेक्‍स्ट्रीन, दूध पावडर, सेल्युलोज, खाद्य तेले, डिटर्जंट पावडर इत्यादी पदार्थ भेसळीसाठी वापरतात. कृत्रिम दूध खाद्य तेल, कपडे धुण्याची पावडर आणि वरील पदार्थांचे मिश्रण करून तयार करतात. पिठूळ पदार्थामुळे दुधाला घट्टपणा येतो. साखरेमुळे दुधाला जडत्व येते. बायकार्बोनेट रसायनामुळे दुधाची आंबण्याची क्रिया मंदावते.

भेसळ ओळखण्यासाठी 
दुधात जर पाणी टाकले असेल तर दुधाचा थेंब तिरप्या गुळगुळीत पट्टीवर टाकल्यास तो झटकन घरंगळेल व पांढरा ओघळ दिसणार नाही. जर दूध शुद्ध असेल तर दुधाचा थेंब तेथेच थांबेल अथवा पांढरा ओघळ करीत खाली येईल.

म्हशीच्या दुधात जर पाणी असेल तर लॅक्‍टोमीटरने दुधाची विशिष्ट घनता मोजल्यास लॅक्‍टोमीटरचे रीडिंग 26 पेक्षा कमी येईल.

दुधामध्ये नेहमीच्या प्रमाणित दुधापेक्षा स्निग्धांश गर्बर ट्यूब पद्धतीमध्ये कमी आल्यास त्या दुधामधील स्निग्धांश काढून घेतले आहेत, असे समजावे. दुधात थोडे आयोडिनचे द्रावण टाकल्यानंतर दुधाला निळा रंग आल्यास त्यामध्ये स्टार्च (पिठूळ पदार्थ) मिसळलेले आहेत, असे समजावे. बाकी भेसळीच्या पदार्थांच्या चाचण्या प्रयोगशाळेमध्ये करता येतात. आपल्या स्वास्थ्यासाठी चांगल्या प्रतीचे दूध तापवूनच पिणे अत्यावश्‍यक आहे.

दुग्धजन्य पदार्थ 
दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दुधापासून बनवलेले पदार्थ. यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे फक्त दुधापासून बनवलेले पदार्थ. उदाहरणार्थ – क्रीम (मलई), दही, ताक, लोणी, तूप, पनीर, दूध पावडर, खवा, चक्का, चीज, योगर्ट आणि दुसरा प्रकार म्हणजे दूध व त्यामध्ये साखर, स्टार्च, खाद्यरंग टाकून बनवलेले पदार्थ- उदा.- आइस्क्रीम, गोड रंगीत दूध, श्रीखंड, दूध बर्फगोळा इत्यादी.

वरील सर्व प्रकारच्या पदार्थांमधील स्निग्धांश काढून घेतले जातात. त्यामुळे या पदार्थांमधील स्निग्धांशाचे प्रमाण ठरवलेल्या मानदापेक्षा कमी येते आणि आपल्याला कमी प्रतीचा पदार्थ मिळतो. ही चाचणी प्रयोगशाळेत करता येते.

तूप 
तुपामध्ये वनस्पतीची भेसळ करतात व जास्त नफा मिळवतात. एका परीक्षानळीत थोडे तूप घेऊन त्यामध्ये हैड्रोक्‍लोरिक आम्ल व थोडी साखर टाकून हलवा. शुद्ध तुपामध्ये वनस्पती मिसळल्यास आम्लाला लाल रंग येईल. तुपाऐवजी वनस्पती टाकून जास्त आर्थिक फायदा मिळवतात. दुसऱ्या प्रकारच्या पदार्थामध्ये स्निग्धांश काढून घेतले जातात. ही चाचणी प्रयोगशाळेत करता येते.

आइस्क्रीम 
आइस्क्रीममध्ये साखरेऐवजी कृत्रिम गोडी आणणारे पदार्थ (सॅकॅरीन, डलसीन, सायक्‍लामेट) टाकतात. हे पदार्थ साखरेपेक्षा अनेक पट गोड असतात. आइस्क्रीम खाल्ल्यास पहिल्यांदा खूप गोड लागते व नंतर जिभेवर कडू चव लागते, तेव्हा हे पदार्थ टाकले आहेत असे समजावे. आइस्क्रीममध्ये घट्टपणा येण्यासाठी स्टार्च (पिठूळ पदार्थ) जास्त प्रमाणात टाकतात. अशा पदार्थांमध्ये थोडेसे आयोडिनचे द्रावण टाकले असता पदार्थाला निळा रंग येतो, तेव्हा स्टार्च आइस्क्रीममध्ये टाकले आहे असे समजावे.

आईस्क्रीममध्ये खाद्य रंग जास्त प्रमाणात व अखाद्य रंगसुद्धा टाकतात. याची चाचणी फक्त प्रयोगशाळेत करता येते.

श्रीखंड, रंगीत दूध 
त्याचप्रमाणे गोड रंगीत दुधात, श्रीखंडामध्ये, दूध बर्फगोळा इत्यादींमध्येसुद्धा कृत्रिम गोडी आणणारे पदार्थ, स्टार्च, अखाद्य रंग टाकतात. याची तपासणी प्रयोगशाळेत करता येते.

मेटॅनिल यलो, ऑरेंज टू, ऱ्होडामाईन बी, ब्लू व्हीआरएस हे रंग अखाद्य आहेत.

कृत्रिम गोडी आणणारे पदार्थ व अखाद्य रंग अन्नपदार्थांबरोबर आपल्या शरीरात जातात. या पदार्थांचे आपल्या शरीरात कधीच पचन होत नाही. ते पदार्थ पचनसंस्थेच्या विविध भागांत तसेच साठतात. प्रमाणापेक्षा त्याचा जास्त साठा झाल्यास कालांतराने त्या भागात कर्करोग होतो. म्हणून नेहमी चांगल्या प्रतीचेच दुग्धजन्य पदार्थ खरेदी करावेत.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love
Advertisements
One Comment leave one →
  1. डिसेंबर 8, 2012 6:30 pm

    फारच सुंदर माहिती दिली आहे.
    आता सुपर मार्केट मधून दुध खरेदी केले म्हणजे सर्व काळजी मिटेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: