Skip to content

शक्‍ती प्रेमाची

फेब्रुवारी 22, 2012
डॉ. श्री बालाजी तांबे

श्‍वास व ऊब यांचा अगदी जवळचा व सरळ संबंध असतो. प्रेमभाव व श्‍वास यांचाही संबंध जवळचा असतो. प्रेमामुळे शारीरिक जवळीक ऊब देते याकडे जास्त लक्ष दिले नाही, तरी आपुलकीमुळे आश्‍वस्त व्हायला होते, जेणेकरून श्‍वासाची गती नैसर्गिक, शांत व संथ चालते. मनात सुरक्षितता वाढली की श्‍वासाची गती संथ राहते. त्याउलट असुरक्षितता वाढली, भीती वाटली की श्‍वासात बदल होतो, त्यामुळे रक्‍ताभिसरणावर परिणाम होऊन शरीर थंड पडू शकते. राग आला, मन सैरभैर झाले तर उष्णता वाढून त्रास होतो. प्रेमाची ऊब असेल तर श्‍वासाचे नियमन व्हायला सोपे जाते.

जिवंतपणाचे किंवा जीवनाचे लक्षण म्हणजेच शरीरात अग्नीचे वास्तव्य- अर्थात उष्णता वा ऊब. एखादी वस्तू थंड करून गोठवली तर ती निष्प्राण झाल्यासारखी पडून राहते. तिला पुन्हा गरम केल्यानंतर ती जिवंत होईल की नाही हा विषय वेगळा. जिवंतपणा सिद्ध करण्यासाठी जसे नाकाजवळ सूत धरले जाते वा नाडी पाहिली जाते, तसेच कपाळाला किंवा मानेला हात लावून शरीरात ऊब आहे की नाही हे पाहिले जाते. श्‍वास व ऊब यांचा अगदी जवळचा व सरळ संबंध असतो. श्‍वासाची गती नैसर्गिक व नियमित असली, की शरीरातील ऊब व्यवस्थित टिकून राहून जीवन जगणे सोपे होते. शरीराचे तापमान खूप थंड होणेही चांगले नसते. असे झाले की श्‍वासाची गती हलके हलके बंद पडण्याकडे जाते. श्‍वासाची गती वाढली तर शरीरातील उष्णता अति प्रमाणात वाढून शरीराचे नुकसान होते. थंडीच्या ऋतूत प्रत्येकाला ऊब हवी असे वाटते, त्यासाठी ऊबदार कपडे वापरणे किंवा उबदार घरात राहणे, बाहेर थंड हवेत न फिरणे, शेकोटीजवळ बसणे, घरात हिटर लावणे या गोष्टी जशा आवडतात. तसेच सर्वांनी एकत्र बसून गप्पा मारणे किंवा आपल्या प्रेमळ व्यक्‍तीच्या सहवासात ऊब मिळविणे नैसर्गिक ठरते. बर्फ पडणाऱ्या थंड प्रदेशात किंवा तापमान शून्याखाली असणाऱ्या प्रदेशात घर उबदार ठेवण्यासाठी अग्नी पेटविण्यासाठी वेगळी जागा असते. तेथे वाहने गरम करण्याचीही व्यवस्था असते. तेथे खूप उबदार कपडे मिळतात. या सर्वांवरून आपल्याला उबेचे महत्त्व कळू शकते.

प्रेमभाव व श्‍वास यांचाही संबंध जवळचा असतो. प्रेमामुळे शारीरिक जवळीक ऊब देते याकडे जास्त लक्ष दिले नाही, तरी आपुलकीमुळे आश्‍वस्त व्हायला होते, जेणेकरून श्‍वासाची गती नैसर्गिक, शांत व संथ चालते. मनात सुरक्षितता वाढली की श्‍वासाची गती संथ राहते. त्याउलट असुरक्षितता वाढली, भीती वाटली की श्‍वासात बदल होतो, त्यामुळे रक्‍ताभिसरणावर परिणाम होऊन शरीर थंड पडू शकते. राग आला, मन सैरभैर झाले, तर उष्णता वाढून त्रास होतो. प्रेमाची ऊब असेल तर श्‍वासाचे नियमन व्हायला सोपे जाते. दीर्घ श्‍वसन, ॐकार गुंजन, अनुलोम-विलोम प्राणायाम वगैरे माध्यमांतून श्‍वासाचे नियमन झाले आणि प्राणशक्‍तीचा पुरवठा वाढला, की शरीर उबदार राहते, प्राणशक्‍ती पुरेशी मिळाली की प्रेमाची देवाण-घेवाणही सोपी होते. प्रेम, श्रद्धा, विश्‍वास, भक्‍ती या सर्व गोष्टी एकमेकांना पूरक असतात.

ऊब ही केवळ थर्मामीटरने मोजायची एक संकल्पना नसून, ती ऊब प्रेमाची व आश्‍वस्त करणारीही असू शकते. प्रेम सगळ्यांवर करावे, परंतु प्रत्यक्ष जवळीक किंवा अति जवळची मैत्री स्त्री-पुरुषांमधील आकर्षणामुळे उत्पन्न होते व ती एका व्यक्‍तीपुरती मर्यादित असते. मनात रुजलेले प्रेम वा भावना व्यक्‍त करण्यासाठी एखादा दिवस नक्की करून ठेवलेला असला तर त्या दिवशी दिलेली भेट किंवा व्यक्‍त केलेल्या भावना कशासाठी आहेत हे सांगण्याची आवश्‍यकता वाटत नाही.

म्हणून असा एक दिवस ठरविणे सोयीचे ठरते. त्या दृष्टीने पाश्‍चिमात्य संस्कृतीत संत व्हॅलेंटाइन यांनी “व्हॅलेंटाइन डे’ची योजना केली. प्रेम व्यक्‍त करण्यासाठी या दिवसाची निवड केलेली असते. 14 फेब्रुवारी हा दिवस यासाठी नक्की करण्यात आलेला आहे. पाश्‍चिमात्य देशांमध्ये त्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्‍तीला सुंदर गुलाबाचे फूल व सुंदर भेट देण्याचा प्रघात प्रचलित आहे. आजकाल भारतातसुद्धा व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची पद्धत निघालेली दिसते.

एकूणच प्रेम एका व्यक्‍तीसाठी प्रकट केले जात असले तरी प्रेमभावना असणे, प्रेमभावना व्यक्‍त होणे, हृदयचक्र विकसित होणे, कुठल्याही अपेक्षेशिवाय सर्व प्राणिमात्रावर प्रेम करता येणे ही गोष्ट साध्य झाली, तर ती गोष्ट आरोग्याला खरोखरच चांगली ठरू शकते.

“व्हॅलेंटाइन डे’ ज्या ठिकाणी साजरा केला जातो, त्या सर्व समाजामध्ये प्रेमाच्या कल्पना फार उथळ तर झाल्या नाहीत ना अशी शंका येते आणि ज्या एका व्यक्‍तीवर प्रेम केले, त्या व्यक्‍तीला व्हॅलेंटाइन डेला फूल देऊन आश्‍वस्त केले तरी नंतर त्याच्याबरोबर जीवन जगण्याची कल्पना फार थोड्या काळापुरती राहून व्हॅलेंटाइन डेचे फूल फार लवकर सुकते, म्हणजेच प्रेम फार लवकर आटते आणि काडीमोड घेतला जातो. अशा वेळी मात्र या व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी व्यक्‍त केलेले प्रेम केवळ एक व्यवहार वा उपचार राहतो; त्यात आश्‍वस्तता येऊ शकत नाही किंवा त्या प्रेमाची ऊब आरोग्यासाठी उपयोगी ठरू शकत नाही.

सर्वांवर प्रेम करावे, सर्वांशी गोड संबंध असावेत, नेहमी सर्वांशी गोड बोलावे, कुठल्याही अपेक्षेशिवाय आपल्याला दुसऱ्याला काहीतरी देता यावे या अपेक्षेने सुरू केलेला साधारण याच सुमाराला येणारा भारतीय परंपरेतील संक्रांतीचा सण अधिक उच्च संस्कारांचा, अधिक नीतिमूल्यांचा व अधिक सोयीचा वाटतो. कुठल्याही तऱ्हेची अपेक्षा न ठेवता सर्वांना काही तरी द्यावे हे शिक्षण सूर्यापासून मिळते. सूर्य सर्वांना सदा सर्वकाळ ऊब व जगण्याची प्रेरणा देत राहतो. म्हणून संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने लहान-थोरांवर व्यक्‍त केलेले प्रेम अधिक उदात्त आहे असे वाटते.

प्रेम म्हणजे दुसऱ्याला काहीतरी देणे, प्रेम म्हणजे दुसऱ्याला मदत करणे, हा विचार पक्का झाला की संबंध अधिक काळ टिकणे शक्‍य होते. प्रेम हे जीवनातील महत्त्वाचे टॉनिक आहे, प्रेम हे जीवनशक्‍ती वाढविणारे रसायन आहे, हे लक्षात घेऊन भारतीयांनी सुरू केलेले दसरा, दीपावली किंवा संक्रांतीसारखे सण असोत किंवा इतर जगात व्हॅलेंटाइनसारख्या संतांनी सुरू केलेला सण असो, तो कौतुकास्पद आहे. अशा प्रेमाच्या सणाची विकृत कल्पना वाढीला न लागता जर सर्वांभूती प्रेम करावे ही कल्पना वाढीला लागली, तर सर्वांनाच प्रेमाची ऊब व शक्‍ती मिळून जीवन सुखी व्हायला मदत होईल.
—- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: