Skip to content

ऊब सूर्याची सूर्योपासना

जानेवारी 13, 2012
डॉ. श्री बालाजी तांबे

सूर्योपासनेचे महत्त्वाचे अंग म्हणजे सूर्यनमस्कार. सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याच्या दिशेकडे तोंड करून सूर्यनमस्कार करण्याने सूर्यशक्‍तीचा लाभ होतो, अग्नीचे पचनसामर्थ्यही वाढते. शारीरिक पातळीवर सूर्योपासना करणे म्हणजे अग्निसंवर्धनासाठी प्रयत्न करणे. म्हणूनच संक्रांतीच्या निमित्ताने अग्नितत्त्वाचे आधिक्‍य असणारे तीळ, उष्ण वीर्याचा गूळ खाण्याची पद्धत आहे.

संपूर्ण विश्‍वाला आपल्या प्रकाशाने व तेजाने उजळवून टाकणाऱ्या सूर्याला सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भारतीयांनी तर सूर्योपासना ही सर्वश्रेष्ठ उपासना मानली आहे. ऊर्जेचा मूळ स्रोत असतो सूर्य. सूर्यकिरणांच्या साहाय्यानेच अन्नधान्याची निर्मिती होऊ शकते आणि यातूनच सर्व जिवांचे पोषण होत असते. पाणी असो, गवत असो, भाज्या, फळे, धान्य, मांस असे काहीही असो, ते शरीरात स्वीकारले जाण्यासाठी, शरीराकडून पचले जाण्यासाठी आणि त्यापासून शरीरावश्‍यक ऊर्जा, शक्‍ती तयार होण्यासाठी एक विशिष्ट संरचना प्रत्येक सजीव प्राणिमात्राला लाभलेली असते. या संरचनेतील प्रमुख घटक म्हणजे जाठराग्नी हा सूर्याचे प्रतीकरूप असतो.

सूर्य संपूर्ण विश्‍वाला ऊब देतो, तसाच जाठराग्नी शरीराला आतून ऊब देत असतो. ऊर्जा, उत्साह, शक्‍ती, सृजनता, सकारात्मकता वगैरे सर्व गोष्टींचे प्रकाशाशी अतूट नाते असते. आयुर्वेदातही अग्नीची कार्ये सांगताना या सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे. म्हणूनच सूर्योपासना व अग्नीचे रक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सूर्योपासनेचे महत्त्वाचे अंग म्हणजे सूर्यनमस्कार. सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याच्या दिशेकडे तोंड करून सूर्यनमस्कार करण्याने सूर्यशक्‍तीचा लाभ होतो, अग्नीचे पचनसामर्थ्यही वाढते. नियमित सूर्यनमस्कार करण्याचे फायदे याप्रकारे सांगता येतात.


शारीरिक फायदे
– सूर्यकिरण हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम असतात. त्यामुळे उगवत्या सूर्यासमोर सूर्यनमस्कार घालण्याने हाडे मजबूत होतात, एकंदर व्यायामाच्या पद्धतीमुळे मांसपेशी घट्ट व स्थिर व्हायला मदत मिळते.
– सूर्यनमस्कारातील विविध आसने अशा प्रकारची आहेत, की त्यामुळे शरीरातील बहुतेक सर्व मोठ्या सांध्यांची हालचाल होते व त्यातूनच एकंदर लवचिकता कायम राहण्यास मदत मिळते.
– सूर्यनमस्कारामुळे एकंदर शरीरठेवण नीट राहायला मदत मिळते, दंड मजबूत होतात, पोटावरील अतिरिक्‍त मेद कमी होतो. शिवाय सूर्यनमस्कार एका विशिष्ट गतीने, विशिष्ट क्रमाने करावयाचा असल्याने एकंदर दैनंदिन हालचालींमध्ये सुसूत्रता येण्यास मदत मिळते, शारीरिक हावभावांमध्ये लालित्य येते.
– सूर्य म्हणजे ऊर्जेचे भांडार. म्हणूनच साक्षात ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या सूर्याची उपासना केली की शक्‍ती आपोआपच मिळते, उत्साह, स्फूर्तीचा अनुभव घेता येतो.
– डोळ्यांचे आरोग्य सूर्याशी संबंधित असते, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. नियमित सूर्यनमस्कार दृष्टीसाठी हितकर होत.

मानसिक फायदे
– सूर्यनमस्कार करताना श्‍वासाची लय आपसूकच सांभाळली जाते, त्यालाच जर मंत्रांची जोड दिली तर प्राणनियमन व मंत्रोच्चारण यांचा समन्वय साधला जाऊन मनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात.
– विशेषतः एकाग्रता साधण्यासाठी, निर्णयक्षमता वाढविण्यासाठी सूर्योपासना उपयोगी पडताना दिसते.

किमान बारा सूर्यनमस्कार नियमित घालायचे असतात, मात्र प्रत्येकाच्या शक्‍तीनुसार, स्टॅमिन्यानुसार ही संख्या बदलू शकते, सहसा असेही दिसते, की नियमितता ठेवली की हळूहळू स्टॅमिना वाढून 12,24, ….108 असे चढत्या क्रमाने सूर्यनमस्कार घालता येतात.

त्र पाठीचा त्रास असणाऱ्यांना, खाली वाकणे शक्‍य नसणाऱ्यांना सूर्यनमस्कार घालता येत नाहीत. हृद्रोग किंवा तत्सम गंभीर आजार असणाऱ्यांनाही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार करावेत. अशा व्यक्‍तींना सूर्यनमस्कारातील आसने स्वतंत्ररीत्या व सोपी करून करण्याचा अधिक चांगला उपयोग होताना दिसतो.

मैत्रीचा तिळगूळ
सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा प्रभाव कमी होत असतो. म्हणून प्रत्येक वर्षी पौषात 14 जानेवारीला मकरसंक्रांत येते, तेव्हा सूर्याची उपासना आवर्जून केली जाते. शारीरिक पातळीवर सूर्योपासना करणे म्हणजे अग्निसंवर्धनासाठी प्रयत्न करणे. म्हणूनच संक्रांतीच्या निमित्ताने अग्नितत्त्वाचे आधिक्‍य असणारे तीळ, उष्ण वीर्याचा गूळ खाण्याची पद्धत आहे. पारंपरिक रिवाजानुसार तीळ फक्‍त खाण्यासाठीच वापरायचे नसून तीळ-मिश्रित पाण्याने स्नान करणे, तिळाचे उटणे अंगाला लावणे, तीळ अग्नीवर टाकून धूप करणे, तिळाचे दान करणे वगैरे मार्गांनीही उपयोगात आणले जातात.

तीळ-गूळ खाण्याने अग्नीची ताकद वाढली की ऊब मिळते. ऊब हा शब्द प्रेम, आपुलकी यांना समानार्थी वापरला जातो. ऊब हवीहवीशी वाटते तसेच प्रेम, आपुलकी, मैत्रीभावही हवेहवेसे वाटणारे असतात. म्हणूनच “”तिळगूळ घ्या गोड बोला” असे म्हणण्याची, सर्वांच्या प्रती असणारा मैत्रीभाव गोड बोलून दाखवण्याची आणि ऊब देणारा तिळगूळ वाटण्याची पद्धत पडली असावी.


डोळ्यांसाठी सूर्योपासना
सूर्योपासना करण्याचे अजून एक उत्तम साधन म्हणजे आकाशध्यान. संक्रांतीच्या निमित्ताने आकाशात पतंग उडवण्याची परंपराही अनेक ठिकाणी असते. यामुळे सूर्यस्नानही होते, एकाग्रता, अचूकता वाढण्यास मदत मिळते.

सूर्योपासना ही डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची असते. सूर्याचा आणि डोळ्यांचा संबंध सुचवणारी एक कथा सुश्रुतसंहितेत सांगितली आहे. जनकराजाने एकदा यज्ञात प्राण्यांचा बळी दिला. पण निरपराध प्राण्यांवर झालेला अन्याय पाहून भगवान विष्णू राजावर रागावले व त्यांनी शाप दिल्याने जनकाची दृष्टी गेली.

चूक लक्षात आल्यावर जनकाने प्रायश्‍चित्त म्हणून कठोर तपस्या केली. तेव्हा संतुष्ट झालेल्या सूर्यदेवांनी जनकाला पुन्हा दृष्टी दिली व बरोबरीने चक्षुर्वेदाचे ज्ञानही दिले. दृष्टी तेजस्वरूप असते असे आयुर्वेदातही सांगितलेले आहे. डोळ्यातील अग्नितत्त्व मंदावू नये म्हणून अंजनासारखे उपचार सुचवलेले आहेत. सूर्य हे डोळ्यांचे अधिदैवत आहे असाही आयुर्वेदात उल्लेख आहे.

गर्भसंस्कारातील महत्त्व
सूर्योपासनेला गर्भसंस्कारातही महत्त्वाचे स्थान आहे. गर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी गर्भवती स्त्रीने उगवत्या सूर्याची पूजा करण्यास सांगितले आहे.

अर्चेत्‌ आदित्यमुद्यन्तं गन्धधूपार्घ्यवार्जपैः ।
…काश्‍यप शारीरस्थान

गर्भवती स्त्रीने उदय होणाऱ्या सूर्याची गंध, धूप, नैवेद्य तसेच जप करून पूजा करावी. गर्भवतीने अस्त होणाऱ्या सूर्याकडे पाहू नये असेही पुढे काश्‍यपाचार्य सांगतात.

सूर्योपासना हा भारतीय संस्कृतीतील अविभाज्य भाग आहे. उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे, ब्राह्ममुहूर्तावर उठून अभ्यास करणे, सूर्यनमस्कार घालणे, सौरसूक्‍त वगैरे वेदमंत्रांचे श्रवण-पठण करणे असे सूर्योपासनेचे अनेक पैलू असून त्यांचा उद्देश आरोग्यरक्षण, ऊर्जासंवर्धन, उत्साह-स्फूर्तीवर्धन हाच आहे. संक्रांतीच्या निमित्ताने सूर्योपासनेला सुरुवात केली तर आपल्यालाही हे लाभ निश्‍चित मिळतील.

—- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: