Skip to content

कोहळा

नोव्हेंबर 25, 2011

Admagnet X

डॉ. श्री बालाजी तांबे
स्वयंपाक, औषधीकरणात कोहळा वापरला जातो. यज्ञयागादी कर्मांतही याची आवश्‍यकता असते. औषधात बहुधा कोहळ्याचे फळ वापरले जाते; मात्र कोहळ्याच्या बिया, पाने, मूळ यांतही औषधी गुणधर्म असतात.

कोहळा हे काकडीच्या जातीतील फळ होय. भोपळ्यासारखे दिसणारे हे फळ अंड्याच्या आकाराचे; पण साधारण दहा-बारा पट मोठे असते. ताज्या फळावर पांढरी दाट लव असते, काही काळाने ही लव गळून जाते. कोहळा हिरव्या रंगाचा असतो. कोहळ्याचा वेल असतो, पाने खरखरीत असतात, तर फुले पिवळ्या रंगाची असतात. वसंत ऋतूमध्ये फुले येतात. ग्रीष्मात फळे धरतात. ही फळे तयार होईपर्यंत शरद-हेमंत ऋतू उजाडतो.

स्वयंपाक, औषधीकरणात तर कोहळा वापरला जातोच, पण यज्ञयागादी कर्मांतही याची आवश्‍यकता असते. औषधात बहुधा कोहळ्याचे फळ वापरले जाते; मात्र कोहळ्याच्या बिया, पाने, मूळ औषधी गुणधर्माचे असतात. चांगली जमीन असली तर एका वेलाला 50-60 कोहळे धरतात. कोवळा कोहळा खाण्यास निषिद्ध समजला जातो. पूर्ण वाढ झालेला, तयार झालेला कोहळा वापरण्यास योग्य असतो. असा कोहळा वेलावरून काढून घेतल्यावर वर्षभर टिकू शकतो.

कोहळ्याला संस्कृत भाषेत कुष्मांड असे म्हणतात, ज्याच्या बीजात किंचितही उष्णता नाही तो कुष्मांड. अर्थातच कोहळा शीतल गुणाचा असतो. याशिवाय कोहळ्याच्या वेलीला पुढीलप्रमाणे पर्यायी नावे आहेत-

महत्फला, बृहत्फला – मोठे फळ असणारी
क्षीरफला- दुधासारखा पांढरा गर असणारे फळ असणारी
स्थिरफला – जिचे फळ दीर्घ काळ टिकते ती
सोमका – शीतल गुणधर्माची
पीतपुष्पा – पिवळ्या रंगाची फुले असणारी
कुष्मांडाला हिंदीत पेठा, इंग्रजीत ऍश गोर्ड, गुजरातीत कोहळू म्हटले जाते, तर याचे बोटॅनिकल नाव बेनिनकासा सेरिफेरा (Benincasa cerifera) असे आहे.

धातुपोषक, पित्तनाशक
आयुर्वेदाच्या ग्रंथात कोहळ्याचे गुणधर्म पुढीलप्रमाणे सांगितले आहेत-
कुष्माण्डं बृंहणं वृष्यं गुरू पित्तास्रवातनुत्‌ । बालं पित्तापहं शीतं मध्यमं कफकारकम्‌ ।।
वृद्धं नातिहिमं स्वादु सक्षारं दीपनं लघु । बस्तिशुद्धिकरं चेतोरोगहृत्सर्वदोषजित्‌ ।।
…भावप्रकाश

कोहळा धातूंची ताकद वाढवतो, विशेषतः शुक्रधातूला पोषक असतो. पित्तनाशक, रक्‍तदोष दूर करणारा आणि वातसंतुलन करणारा असतो. तयार झालेला ताजा कोहळा अतिशय थंड असल्याने, पितशमनास उत्तम असतो.

तोच काही दिवसांनी मध्यम पिकला की प्राकृत कफाचे पोषण करतो, तर साधारण जून झाला असता पचण्यास हलका होतो, साधारण थंड असतो, चवीला गोड, क्षारयुक्‍त असतो, अग्नीला प्रदीप्त करतो, बस्ती (मूत्राशयाची) शुद्धी करतो, सर्व दोषांना संतुलित करतो. पथ्यकर असतो आणि सर्व प्रकारच्या मानसिक रोगांवर उपयोगी असतो.

कोहळ्याची भाजी
कोहळा धुवून त्याची साल काढून घ्यावी. कापून आतल्या बिया काढून टाकाव्यात. गराचे साधारण दीड सेंटिमीटर लांबी-रुंदी-उंचीचे तुकडे करावेत. पातेल्यात तूप घ्यावे. गरम झाले की त्यात जिरे, हिंग, किसलेले आले टाकावे. हवे असल्यास मिरचीचे तुकडे टाकावेत. जिरे तडतडले की कोहळा टाकून, हलवून वर झाकण ठेवावे. कोहळा शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे फोडी फार नरम होणार नाहीत याकडे लक्ष ठेवावे. शिजताना चवीनुसार मीठ व साखर घालावी. वरून ओल्या नारळाचा कीस तसेच बारीक कापलेली कोथिंबीर घालावी. कधीतरी रुचिपालट म्हणून भाजी शिजताना मोड आलेल्या मेथ्या, हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ घालता येते. या प्रकारची कोहळ्याची भाजी अतिशय पथ्यकर, रुचकर आणि पचण्यास हलकी असते. भाकरीबरोबर खाण्यास छान लागते.

कोहळ्याचे रायते
कोहळा धुवून त्याची साल काढून टाकावी. कापून आतल्या बिया वेगळ्या कराव्यात. बारीक तुकडे करावेत. पातेल्यात थोडेसे तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, बारीक वाटलेली मिरची टाकावी. झाकण ठेवून शिजू द्यावे. शिजताना चवीनुसार मीठ व साखर घालावी. शिजल्यावर वेगळ्या भांड्यात गार करायला ठेवावे. गार झाल्यावर वरून दही व कापलेली कोथिंबीर घालावी.

औषधी कोहळा
– कोहळा औषध म्हणून पुढीलप्रमाणे वापरला जातो-
– कोहळा बस्तीशुद्धिकर व शीत वीर्याचा असल्याने लघवी साफ होण्यास मदत करतो. त्यामुळे लघवीला जळजळ होत असल्यास, लघवी अडखळत किंवा पूर्ण होत नसल्यास व्यवस्थित तयार झालेल्या कोहळ्याच्या गराचा चार – पाच चमचे रस, त्यात चिमूटभर जिरे पूड व चिमूटभर धणे पूड टाकून घेण्याचा उपयोग होतो.
– आम्लपित्ताचा त्रास होण्याची सवय असणाऱ्यांनी सकाळी कोहळ्याचा चार-पाच चमचे रस साखरेसह घेणे चांगले असते. डोके दुखणे, मळमळणे, उलट्या होणे यासारखे त्रास बंद होतात.
– मूतखडा किंवा लघवीतून खर जाते त्या विकारावर कोहळ्याचा चार-पाच चमचे रस, त्यात चिमूटभर जवखार टाकून घेण्याचा फायदा होतो.
– लघवी अडली असल्यास किंवा पूर्ण साफ होत नसल्यास किसलेला कोहळ्याचा गर ओटीपोटावर ठेवण्याचा उपयोग होतो.
– शरीरात उष्णता अति प्रमाणात वाढल्याने नाकातून रक्‍त येते, लघवीतून रक्‍त जाते किंवा शौचावाटे रक्‍तस्राव होतो. यावर चार चमचे कोहळ्याचा रस व दोन चमचे ताज्या आवळ्याचा रस हे मिश्रण खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो.
– तीव्र प्रकाशात, संगणकावर दीर्घ काळ काम करण्याने किंवा प्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, दुखणे, प्रकाश सहन न होणे, डोळ्यांतून पाणी येणे यांसारख्या तक्रारींवर डोळ्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवण्याचा व नाकात साजूक तुपाचे थेंब टाकण्याचा उपयोग होतो.
– तापामुळे हाता-पायांच्या तळव्यांची तीव्र जळजळ होते. अशा वेळी तळव्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवल्याने बरे वाटते.
– कोहळ्याचे बी सोलून घेऊन व्यवस्थित सुकवून ठेवता येते. हे बी दुधात शिजवून तयार झालेली खीर खाल्ल्यास धातूंचे पोषण होते, शरीर भरण्यास मदत मिळते.
– वीर्यवृद्धीसाठी कोहळ्याचा पाक उत्तम असतो. शुक्राणूंची संख्या किंवा गती कमी असणे, अशक्‍तपणा जाणवणे वगैरे त्रासांवर, तसेच कोणत्याही दीर्घ आजारपणामुळे येणारी अशक्‍तता दूर होण्यास, शस्त्रकर्मानंतर कोहळ्यापासून तयारी केलेले धात्री रसायनासारखे रसायन घेणे उत्तम असते.
– जून कोहळा क्षारयुक्‍त व अग्निदीपनास मदत करणारा असल्याने, कोहळ्याचा क्षार करता येतो. हा क्षार पोटदुखीवर उत्तम असतो, पचनास मदत करतो.
– पेठा ही उत्तर भारतातील, आग्रा येथील प्रसिद्ध मिठाई कोहळ्यापासून बनविलेली असते. गुलाबाच्या अर्कासह तयार केलेला पेठा अतिशय चविष्ट असतो, तसेच पौष्टिकही असतो.
– दक्षिण भारतात सांबार करताना त्यात कोहळा टाकण्याची पद्धत आहे. कोहळ्याचे सांडगे करून ठेवता येतात. तसेच कोहळ्याची भाजी, रायता, सूप वगैरेही बनवता येते. पथ्यकर असा कोहळा स्वयंपाकात या प्रकारे वापरला तर त्याचा आरोग्य राखण्यास निश्‍चित हातभार लागतो.

—- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: