Skip to content

च्यवनप्राश

नोव्हेंबर 23, 2011
डॉ. श्री बालाजी तांबे

च्यवनप्राश या प्रसिद्ध रसायनात आवळा हे मुख्य द्रव्य असते. च्यवनप्राश बनविण्याची पद्धतही शास्त्रोक्‍त असावी लागते. त्यासाठी ग्रंथोक्‍त योग्य पद्धत माहीत असणे व त्या पद्धतीने च्यवनप्राश बनविण्याचा अनुभव गाठीशी असणे आवश्‍यक आहे.

चरकसंहितेमध्ये आवळ्यापासून बनविलेली निरनिराळी रसायने सांगताना सुरुवातीला सांगितलेले आहे,

करत्रचितानां यथोक्‍तगुणानाम्‌ आमलकानां उद्‌धृनास्थ्नां
शुष्कचूर्णितानां पुनर्मार्थे फाल्गुने वा मासे ।
…चरक चिकित्सास्थान

कार्तिक महिन्याच्या शेवटापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत जेव्हा आवळा आपल्या रस, वीर्याने परिपूर्ण झालेला असतो, तेव्हा झाडावरून हाताने तोडून गोळा करावा.

याठिकाणी लक्षात घ्यायची मुख्य गोष्ट म्हणजे झाडावर उत्तम पोसला गेलेला, रस-वीर्याने परिपूर्ण झालेला आवळाच औषधात वापरणे अपेक्षित असते. पूर्ण वाढ होण्यापूर्वीच झाडावरून गळून पडलेले आवळे वापरणे योग्य नाही. याशिवाय उत्तम कसदार जमिनीमध्ये तयार झालेला, गंध, रूप व चव उत्तम असलेला, पुरेसा रस असलेला आवळाच रसायन म्हणून वापरण्यास योग्य असतो, असेही ग्रंथकार सांगतात.

च्यवनप्राश तयार करताना पूर्ण तयार झालेला व रसरशीत आवळा वापरावा असे सांगितलेले असते, आवळ्याचे चूर्ण करायचे असले तर ताज्या आवळ्यातून बी काढून मग वाळवून चूर्ण करावे असे सांगितलेले असते.

आवळ्याच्या दोन जाती असतात, मोठा आवळा व रान आवळा. मोठा आवळा चवीला आंबट, गोड, रसरशीत असतो व औषधात वापरला जातो. रान आवळे मात्र आकाराने लहान असून चवीला तुरट, कडवट व कोरडे असतात. हे आवळे औषधासाठी वापरणे योग्य नव्हे. रायआवळा म्हणून अतिशय आंबट छोटे फळ मिळते पण नावात साधर्म्य असले तरी त्याचा रसायन आवळ्याशी काही संबंध नसतो.

आयुर्वेदात आमलकी, धात्री, वगैरे नावांनी ओळखला जाणारा आवळा हे एक सुलभतेने उपलब्ध असणारे उत्कृष्ट रसायनद्रव्य आहे.

वृष्यं रसायनं रुच्यं त्रिदोषघ्नं विशेषतः ।
वमनप्रमेहशोफपित्तास्र श्रमविबन्धाध्मान विष्टम्भघ्नम्‌ ।।
…धन्वंतरी निघण्टु

आवळा शुक्रधातूला पोषक, रसायन गुणांनी परिपूर्ण असतो, रुची वाढविणारा असतो; त्रिदोषांचे संतुलन करण्यास समर्थ असतो, विशेषतः पित्तदोषाचे शमन करतो; ताप, दाह, उलटी, प्रमेह, शोथ, रक्‍तपित्त, श्रम, मलावष्टंभ, पोटफुगी वगैरेंसाठी औषध म्हणून उपयुक्‍त असतो. “इदं वयःस्थापनानां श्रेष्ठम्‌’ असेही चरकसंहितेमध्ये म्हटलेले आहे. वय वाढले तरी त्यामुळे होणारी शरीराची झीज कमीत कमी प्रमाणात व्हावी किंवा तारुण्य टिकविणारे द्रव्य म्हणजे वयःस्थापन द्रव्य होय. आवळा हा नुसते वयःस्थापन करतो असे नाही तर तो अशा प्रकारच्या द्रव्यात श्रेष्ठ, सर्वोत्तम समजला जातो, यावरूनच आवळ्याची महती लक्षात येते.

म्हणूनच आवळा असंख्य रसायनांमध्ये प्रयुक्‍त केलेला आहे. च्यवनप्राश या प्रसिद्ध रसायनात आवळा हे मुख्य द्रव्य असते हे बहुतेक जणांना माहिती असते. आयुर्वेदाच्या संहितांमध्ये आमलकायस, ब्राह्मरसायन, केवलामलक रसायन, आमलकी घृत, आमलकावलेह वगैरे अशी अनेक रसायने आहेत की जी मुख्यत्वे आवळ्यापासून तयार केलेली असतात. चरक, शारंगधर बहुतेक संहितांमध्ये च्यवनप्राश अवलेह वर्णन केलेला आहे. च्यवनप्राश प्रभावी होण्यासाठी त्यात वापरलेली द्रव्ये तर उत्तम प्रतीची असावी लागतातच व बरोबरीने च्यवनप्राश बनविण्याची पद्धतही शास्त्रोक्‍त असावी लागते. च्यवनप्राश अतिशय प्रसिद्ध असल्याने आजकाल अनेक जण तो बनवितात, पण त्यासाठी ग्रंथोक्‍त योग्य पद्धत माहीत असणे व त्या पद्धतीने च्यवनप्राश बनविण्याचा अनुभव गाठीशी असणे आवश्‍यक आहे.

च्यवनप्राश बनविण्याची कृती
1. रसरशीत ताजे आवळे निवडून पाण्याने स्वच्छ धुवावे व नंतर रात्रभर पाण्यात भिजत घालावेत (पाण्यात थोडेसे मीठ घालावे).
2. सूचीतील 1 ते 33 द्रव्यांचे बारीक तुकडे करून रात्रभर पाण्यात भिजत घालावे.
3. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आवळे पाण्यातून काढून पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवावेत. सर्व आवळे सुती कापडात बांधून पोटली तयार करावी. भिजलेल्या सर्व वनस्पती पाण्यात कुस्करून घ्याव्यात.
4. साधारण 20 लिटर पाणी घेऊन या सर्व वनस्पती त्यात घालून काढा बनविण्यासाठी मंद आचेवर ठेवणे. यावेळी आवळ्यांची पोटली अधांतरी लटकत ठेवावी.
5. आवळे शिजल्यावर पोटली बाहेर काढून घ्यावी.
6. एकीकडे मंद आचेवर काढा उकळणे सुरू ठेवावे.
7. शिजलेल्या आवळ्यांमधून बिया काढून टाकाव्या.
8. आवळ्याच्या फोडी 40 मेशच्या स्टेनलेस स्टीलच्या चाळणीवर अथवा सुती कपड्यावर घासून आवळ्याच्या गरातील धागे काढून टाकून बी-विरहित व धागेविरहित गर जमा करावा. या गरालाच मावा म्हणतात.
9. योग्य आकाराच्या जाड बुडाच्या स्टेनलेस स्टीलच्या किंवा कल्हई असलेल्या पातेल्यात तेल व तुपावर मंद आचेवर पाण्याचा अंश उडून जाईपर्यंत मावा परतावा. यावेळी मावा करपणार नाही वा इकडे तिकडे उडणार नाही अशी काळजी घेणे आवश्‍यक असते.
10. एका बाजूला काढा साधारण एक चतुर्थांश होईपर्यंत उकळावा.
11. तयार झालेला काढा कापडातून गाळून घ्यावा व काढ्याची द्रव्ये बाजूला टाकून द्यावी.
12. गाळलेला काढा साधारण घट्ट होईपर्यंत उकळवत ठेवावा.
13. साखरेचा पाक करून घ्यावा.
14. साखरेचा पाक, घट्ट केलेला काढा व आवळ्याचा परतलेला मावा एकत्र करून हे सर्व मिश्रण मंद आचेवर ठेवून चाटण-अवलेह होईपर्यंत ठेवावा. यावेळी अवलेह करपणार नाही याकडे लक्ष ठेवावे लागते.
15. जवळ जवळ अवलेह तयार होत आला आहे असे वाटले की प्रक्षेप द्रव्ये घालावीत व सर्व मिश्रण एकजीव करावे.
16. अवलेह साधारण गार झाल्यावर त्यात मध घालून नीट एकत्र करावे.
17. च्यवनप्राशची गुणवत्ता व प्रभाव वाढविण्यासाठी सोन्याचा वर्ख, चांदीचा वर्ख वसंतमालिनी, मकरध्वज वगैरे द्रव्ये मधात मिसळून टाकता येतात.
18. तयार झालेला च्यवनप्राश योग्य आकाराच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवावा व आवश्‍यकतेप्रमाणे वर्षभर वापरावा.

सूचना
आवळे आम्ल रसाचे असल्यामुळे च्यवनप्राश बनविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत ऍल्युमिनियम वा हिंदालियमची भांडी, चमचे, झाकण्या वापरू नये.
अशा प्रकारे तयार केलेला च्यवनप्राश दीर्घकाळ टिकू शकतो व रस या गुणांनी परिपूर्ण असतो. च्यवनप्राशची उपयुक्‍तता आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये याप्रकारे सांगितलेली आहे, मेधा, स्मृती, आकलनशक्‍ती चांगली राहते; कांती, वर्ण, त्वचा उजळते, तेजस्विता येते; मन प्रसन्न राहते; हृद्रोग, खोकला, दमा, तृष्णा, वातरक्‍त, उरोग्रह, शुक्रदोष, मूत्रदोष, विविध वात-पित्त विकारांवर च्यवनप्राश उपयुक्‍त असतो. रसायन म्हणून सेवन केल्यास मनुष्य अकाली वृद्धत्वापासून तसेच सर्व रोगांपासून दूर राहू शकतो.

—- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: