Skip to content

जीवनरसदायी आवळा

नोव्हेंबर 12, 2011
डॉ. श्री बालाजी तांबे

केवळ आवळ्याच्या फळातच रसायनाचे गुण आहेत असे नव्हे, तर आवळ्याच्या झाडाच्या वातावरणातही हा गुण आलेला दिसतो. त्यामुळे आवळ्याच्या झाडाच्या सान्निध्यात राहिल्यानेही पित्तशमन, रक्‍तसंवर्धन, रक्‍ताभिसरण वाढून शरीराला “रसायनाचे’ असे फायदे मिळतात.

वाजीकरण व रसायन हा आयुर्वेदाचा महत्त्वाचा विषय. सळसळते तारुण्य हे सप्तधातू-रसांवर व विशेषकरून वीर्यधातूवर अवलंबून असते. अर्थात जगण्यात व जीवनात रस असावा लागतो, हे निश्‍चितच. च्यवनप्राशसारखी काही रसायने आहेतच, पण मोठ्या प्रमाणात हिरडा व आवळा हीच महत्त्वाची रसायनद्रव्ये. योग्य योजनेद्वारा रसायनाने वीर्यवृद्धी होते. शरीरातील संपूर्ण चलनवलन व पेशीपेशीमधील किंवा सर्व अंतर्गत अवयवरचनेतील संदेश देवाणघेवाणसुद्धा रसायनामुळेच व्यवस्थित चालते. जगण्यातील रस हाही व्यक्‍ती-व्यक्‍तीतील संपर्क व संवाद यामुळेच वाढतो व त्यासाठी आवश्‍यकता असते ताकदवान व निरोगी चेतासंस्थेची. या सर्व कार्यासाठी उत्तम पर्याय आहे “आवळा’.

आवळ्याचे अनेक प्रकार असतात. डोंगरी आवळ्यात बी मोठी असते, गर त्यामानाने कमी असतो व गरात धागे अधिक असतात. हे आवळे चवीला अधिक तुरट असतात. काही प्रकारचे आवळे मोठे रसरसशीत, अधिक गर व अधिक रस असणारे असतात. अपरिपक्‍व म्हणजे नीट न वाढलेले आवळे व झाडावरून गळून खाली पडून वाळलेले आवळे औषधाच्या दृष्टीने तेवढेसे उपयोगी नसतात. असे आवळे वाळवून आवळकाठी वा आवळकाठीचे चूर्ण म्हणून विकले जाते किंवा त्यांना भिजत घालून च्यवनप्राशसारख्या रसायनात वापरलेले दिसते. असे कमी दर्जाचे आवळे वापरल्यामुळे अशा वस्तूंचा प्रभाव खूपच कमी झाला असल्याचे दिसते. त्यामुळे अशी उत्पादने स्वस्त वाटली तरी त्यांची उपयोगिता व गुण खूपच कमी असतात.

त्यामुळे औषधांचे उत्पादन करतेवेळी आवळे रसरसशीत व ताजे हवेत. अशा रसरसशीत, ताज्या आवळ्यांचा रस साखरेबरोबर वा मधाबरोबर घेण्याने उपयोग होतो. मीठ लावून आवळे खाण्यात कसा आनंद होतो, हे चार तरुण मुलींना विचारायला हरकत नाही. आवळ्याचे लोणचे हा एक पचनासाठी मदत करणारा अप्रतिम पदार्थ आहे. त्याहीपेक्षा उपयोगी व महत्त्वाचा पदार्थ आहे मोरावळा. साखरेच्या पाकात मुरलेला आवळा म्हणजे मोरावळा. पूर्ण आवळे टोचे मारून गरम पाण्यात किंचित वाफवून साखरेच्या पाकात टाकून किंवा किसून साखरेच्या पाकात टाकून मोरावळा केला जातो. मोरावळा करण्याची कृती कोणतीही असली तरी मोरावळा मुरू देणे म्हणजेच जुना होऊ देणे खूप महत्त्वाचे असते. म्हणून जुना मोरावळा गुणांमध्ये श्रेष्ठ असतो. पित्तशामक म्हणून मोरावळ्याचा खूप उपयोग होतो. वाढलेले पित्त- मग ते उन्हाळ्यातील असो वा इतर ऋतूतील- नेहमीच त्रास देते व ते मेंदूचे व डोळ्यांचे अधिक नुकसान करते. अशा वेळी मोरावळ्याचा खूप उपयोग होतो. यकृत व्यवस्थित काम करत नसल्यास किंवा यकृताचा आकार वाढत असल्यास मोरावळ्याचा चांगला उपयोग होतो. अशा वेळी दिवसातून दोनदा मोरावळा खाण्याने खूप उपयोग होताना दिसतो. गुलाबाची फुले साखरेत टाकून तयार झालेला गुलकंद सेवन केल्यासही शरीरात शीतता व शांतता उत्पन्न होते, परंतु ज्यांना गुलकंदाची गोड चव फारशी आवडत नाही, मोरावळ्याची आंबटगोड चव आवडते व ज्यांना पित्तशमनाची अधिक गरज आहे व मुख्य म्हणजे ज्यांना रसायनाचा फायदा हवा आहे त्यांनी मोरावळा सेवन करणे अधिक योग्य ठरते.

केवळ आवळ्याच्या फळातच रसायनाचे गुण आहेत असे नव्हे, तर आवळ्याच्या झाडाच्या वातावरणातही हा गुण आलेला दिसतो. त्यामुळे आवळ्याच्या झाडाच्या सान्निध्यात राहिल्यानेही पित्तशमन, रक्‍तसंवर्धन, रक्‍ताभिसरण वाढून शरीराला “रसायनाचे’ असे फायदे मिळतात. म्हणूनच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमा या काळात आवळी भोजन, आवळीपूजन वगैरे करण्याची परंपरा असल्याचे दिसते. या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसावे, विश्रांती घ्यावी, तेथे बसून काही खावे- जेणेकरून झाडाच्या आजूबाजूला असलेल्या प्राणशक्‍तीचा उपयोग होईल, अशी प्रथा असलेली दिसते. भगवान विष्णूंना जशी तुळशी प्रिय आहे तसा त्यांना आवळाही प्रिय आहे. म्हणून आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णुपूजन केल्याने पुण्य मिळते असे म्हणतात.

“आवळा देऊन कोहळा काढणे’ अशी एक म्हण आहे. याचा अर्थ असा, की बारीकशी वस्तू देऊन त्याच्या मोबदल्यात मोठा मोबदला मिळविणे. कोहळा हेसुद्धा रसायनच आहे, पण त्यात सर्व सहा रस नसतात, तर पाच रस असतात. कोहळ्याचाही वीर्यवर्धनासाठी उपयोग होतो. म्हणून आकाराने लहान असलेल्या आवळ्याची तुलना आकाराने मोठ्या असलेल्या कोहळ्याशी करून अशी म्हण व्यवहारात आली असावी.

असा हा बहुगुणी, रसायनी, तारुण्य देणारा, नवजीवन देणारा आवळा. आवळ्यापासून बनविलेला मोरावळा व पूर्ण रसायनात रूपांतर केलेले “संतुलन च्यवनप्राश’, “संतुलन अमरप्राश’, “संतुलन आत्मप्राश’, “संतुलन सुहृद्‌प्राश’ असे अनेक प्रकारचे प्राश मनुष्याला आयुष्यवृद्धी व शांती देण्यासाठी खूपच उपयोगी पडताना दिसतात.
—-Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: