Skip to content

आरोग्यप्रकाश

ऑक्टोबर 26, 2011
डॉ. श्री बालाजी तांबे

घरात श्री गजाननाचे आगमन होणार म्हणून गणपती उत्सवाच्या वेळी साधारणतः संपूर्ण घर साफ करून घेऊन रंगरंगोटीही केली जाते. ज्यांच्या घरात नवरात्र बसते ते नवरात्रापूर्वी घराचा कानाकोपरा रंगवून घेतात, घर सजवतात. हे दोन्ही धार्मिकतेत मोडणारे उत्सव सोडले तरी दीपावलीचा उत्सव सर्व जातिधर्माचे लोक साजरा करतात. या उत्सवाच्या निमित्ताने घराला डागडुजी, रंगरंगोटी करतात, घरात एखादी नवीन वस्तू घेतली जाते, घर सजविले जाते. घर उठून दिसावे, डोळ्यांत भरावे म्हणून घराच्या बाहेरच्या बाजूला आकाशकंदील टांगले जातात, घराला रोषणाई केली जाते. अगदीच काही नाही तरी घराबाहेर चार – सहा पणत्या तरी पेटवून ठेवल्या जातात.

जीवन हा एक उत्सव आहे असे लक्षात घेतले, तर ज्या वेळी प्राणशक्‍ती विकसित होऊन टाळूच्या जागी ब्रह्मरंध्रामध्ये प्रकाशते, तो जीवनाचा महोत्सव म्हणायचा. दीपावली साजरी करण्यासाठी जशी घराची रंगरंगोटी, आरास केली जाते तसे हा महोत्सव साजरा करताना शरीराकडे लक्ष का दिले जात नाही? शरद ऋतूत पित्त वाढणे प्रकृतीचा नियम आहे. वाढलेले पित्त शरीरातून बाहेर काढण्यासाठी, पोट साफ करण्यासाठी विरेचनासारखी योजना आयुर्वेदाने केली आहे. पंचतत्त्वांच्या शुद्धीसाठी, तसेच त्रिदोषांच्या शुद्धीसाठी पंचकर्माची योजना केली, तर मग पंचकर्मासारखे वा विरेचनासारखे आयुर्वेदिक उपचार मनुष्य का करून घेत नाही?

पूर्वी, दीपावलीचा महोत्सव असो, वा घरात यज्ञयाग, लग्न वगैरे मोठा प्रसंग असो, शरीरशुद्धी प्राधान्याने केली जात असे. प्रत्येक व्यक्‍ती त्याच्या शरीररूपी घरात राहते, नंतर हे शरीर चुना-माती-विटांनी बांधलेल्या घरात राहते. नुसतेच माती-विटांच्या घराला चांगले ठेवणे योग्य नाही; पण कालमहिमा असा की, फक्‍त बाह्य आवरणाला व वरवरच्या दिखाव्याला व देखाव्यालाच महत्त्व आल्यानंतर शरीर हे आत्म्याचे खरे घर असल्याचे विस्मरणात गेले असावे. शरीराची नुसतीच शुद्धी करून चालत नाही तर शरीरावर तेज दिसेल, लोक आकर्षित होतील, त्यातून एकमेकांशी चांगले संबंध जुळतील व ती व्यक्‍ती सर्वांना हवीहवीशी वाटेल याचीही आवश्‍यकता असते. मायकेल जॅक्‍सन, एलव्हिस प्रेस्ली, सध्या प्रसिद्ध असलेली पॉप गायिका लेडी गागा; तसेच काही भारतीय चित्रपटांतून दाखविलेल्या नृत्यांमध्ये नृत्य करणाऱ्याच्या पोशाखाला छोटे छोटे विजेचे दिवे लावून नृत्य करणाऱ्याचे शरीर आकर्षक केलेले दिसते. म्हणजे शरीर आकर्षक करून इतरांना दृष्टिसुख देणे आवश्‍यक असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. असे असताना शरीरशुद्धी करून शरीराची कांती व तेज वाढेल अशी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे, हे लक्षात घेऊन दीपावलीचा महोत्सव सुरू केलेला असावा.

एक गोष्ट निश्‍चित, की नुसत्या शरीरशुद्धीने येणारे तेज चारी दिशांना फाकण्यास असमर्थ ठरेल, त्यासाठी विशेष आहार व रसायनाची व्यवस्था करावी लागेल. याच उद्देशाने दीपावली महोत्सवात खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. दिवाळीच्या फराळात असणाऱ्या अनारसे, करंजीसारख्या पदार्थांमुळे वीर्यवृद्धी पर्यायाने तेजवृद्धी होतेच.

शरीराबरोबरच मनाचेही आरोग्य उत्तम राहावे या दृष्टिकोनातून शरीराला व मनाला विश्रांती मिळण्याच्या हेतूने या महोत्सवात रोजच्या व्यवसायातून किंवा शालेय शिक्षणातून सुटी घेऊन स्वतःकडे लक्ष देण्याची योजना केलेली दिसते. तसेच, नवीन वस्त्रे धारण करणे, दागदागिने घालणे या गोष्टी शरीराला सजवण्याच्या दृष्टीने योजलेल्या दिसतात. मनाचे आरोग्य हे शांत चित्तवृत्तीबरोबरच प्रेमाविष्कारावर, तसेच इतरांशी जमवून घेण्याच्या व घेण्यापेक्षा देण्याच्या स्वभावावर अवलंबून असते. म्हणून आपल्याकडे पाहुण्यांना काही दिवसांसाठी वा भोजनासाठी आमंत्रित करणे, आपल्या इष्टमित्रांबरोबर सहलीला जाणे वगैरे कार्यक्रम आयोजित केलेले दिसतात. मनाची सर्वात अधिक शुद्धी दातृत्वाने होते व त्यामुळे माणसेही जोडली जातात म्हणून दीपावलीच्या निमित्ताने एकमेकांना भेट देण्याचा पायंडा शास्त्रोक्‍त पायावर उभा आहे असे दिसते.

दीपावली उत्सवाची सुरुवात पशुत्वावर विजय मिळाल्याप्रीत्यर्थ गोमातेच्या पूजनाने होते आणि शास्त्र व आप्तवचन यांना मान देण्यासाठी गुरुद्वादशीच्या पूजनाने होते.

शरीर तेजस्वी राहण्यासाठी औषधी वनस्पतींनी बनविलेले उटणे-उद्वर्तन लावून अप्रतिम आयुर्वेदिक तेलाने अभ्यंग मसाज घेण्याची पद्धत सुचविलेली दिसते. दीपावली हा प्रकाशाचा महोत्सव असल्याने शरीराचे तेज प्रकट व्हावे म्हणून दीप घेऊन ओवाळण्याची पद्धत आहे असे दिसते. म्हणून नरकचतुर्दशीच्या दिवशी अर्धे स्नान झाल्यावरपण ओवाळण्याची पद्धत आहे.

आपल्या आसपास असलेल्या जडवस्तू आपल्या जीवनात महत्त्वाच्या आहेत, त्यांच्याशिवाय आपले जीवन सुरळीत चालणार नाही. तसेच शरीर, संपत्ती येथेच सोडून जावे लागत असले, तरी जिवंत असेपर्यंत त्यांचे महत्त्व जाणून घेऊन धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन यांची योजना केलेली दिसते.

पाडव्याच्या दिवशी प्रेमाच्या संबंधासाठी, भाऊबिजेच्या दिवशी नातेसंबंधासाठी आणि या सर्व संबंधांना पावित्र्य मिळावे या हेतूने ओवाळण्याची योजना केलेली दिसते.

शरीरशुद्धी व तेजवृद्धी याने आत्मदीप प्रकट झाला, की एकूणच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. प्रेमाची नाती अधिक दृढ होतात. भाऊ-बहीण हे रक्‍ताच्या नात्याचे अत्यंत पवित्र स्वरूप असून, त्यादृष्टीने बहीण-भावांचे प्रेम व्यक्‍त करण्यासाठी असते भाऊबीज. या दिवशी तेजवृद्धीला अधिक उजाळा मिळण्याच्या दृष्टीने बहीण भावाला ओवाळते व भाऊ बहिणीला भाऊ-बहिणीच्या नात्याचे, स्त्रीत्वाचे, स्त्रीच्या अपेक्षांचे रक्षण करण्याचे वचन देतो.

या दीपमहोत्सवामध्ये शक्‍तीचा प्रभाव अत्युच्च शिखरावर असतो. इतकेच नव्हे तर, न दिसणारी शक्‍ती प्रत्यक्ष दृश्‍यरूप प्रकाशापर्यंत पोचलेली असते. अशा वेळी प्रत्येक अणुरेणूत, जडवस्तूत असलेल्या परमेश्‍वराचे अस्तित्व, वस्तूला असलेल्या भावना आणि एकूण निसर्गचक्राचे गणित समजले, की तुळशीच्या लग्नामागचे रहस्यपण उलगडते. एकूणच हा दीपावली महोत्सव प्रत्येक व्यक्‍तीला आनंदाच्या उच्च शिखरावर तर नेतोच; पण भारतीय परंपरेलासुद्धा अत्युच्च स्थानावर प्रकाशमान करतो.

‘फॅमिली डॉक्‍टर’च्या सर्व वाचकांस विक्रम संवत्‌ 2068 हे वर्ष व दीपावली महोत्सव संपूर्ण आरोग्याचा, उत्कर्षाचा, समृद्धीचा, मैत्री-शांती-आनंदपूर्ण जावो.
—-Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: