Skip to content

मार्च 20, 2011
स्वेदनचिकित्सा-होळी

डॉ. श्री बालाजी तांबे

Friday, March 18, 2011 AT 12:00 AM (IST)

Tags: family doctor, health, dr. balaji tambe

शिशिरामध्ये थंडीमुळे वाढलेला वात, साठलेला कफ आणि नंतर येणाऱ्या वसंतामध्ये प्रकुपित होणारा कफ यांचे संतुलन करण्यासाठी बरोबर या काळात होळीची योजना केलेली आढळते. धूलिवंदनाच्या दिवशी होळीची रक्षा (राख) अंगाला लावली जाते. एरंड, नारळ, शेणाच्या गोवऱ्या, नैवेद्यासाठी तयार केलेली पुरणपोळी, तूप वगैरे द्रव्यांचा संस्कार असणारी रक्षा अंगाला लावणे हेसुद्धा आयुर्वेदाच्या दृष्टीतून जणू उद्वर्तनासारखा उपचारच असतो. अशी रक्षा जंतुघ्न असते, त्वचेसाठी संरक्षक असते.

फा ल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो. होळीच्या पाठोपाठ येणारे धूलिवंदन हा वसंतोत्सवाचा आरंभ असतो. ऋतूंच्या दृष्टीने विचार केला तर शिशिर ऋतू संपून वसंत ऋतू सुरू होणार असतो, त्या मध्यंतरावर होळी येते. म्हणूनच “होळी जळाली, थंडी पळाली’ यासारखी उक्‍ती आजही रूढ आहे.

होळीचा सण साजरा केला जातो, अग्नीची पूजा करून, अग्नीला नैवेद्य-नारळ वगैरे अर्पण करून. “अग्नी’चे महत्त्व आपण सर्वजण जाणतोच. अन्न शिजविण्यासाठी अग्नी लागतो, हेच अन्न सेवन केल्यानंतर त्याचे शक्‍तीत रूपांतर होण्यासाठी सुद्धा शरीरस्थ अग्नी आवश्‍यक असतो. आयुर्वेदामध्ये औषधे बनविण्यासाठी, उपचार करण्यासाठी अग्नीची मोठी आवश्‍यकता असते. अग्नीचे रक्षण व जतन करण्याची आवश्‍यकता मनावर बिंबवण्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये होळीच्या रूपाने अग्निपूजा समाविष्ट केलेली असावी.

आयुर्वेदिक दृष्टीने विचार केला असता होळी हा स्वेदन उपचाराचा एक प्रकार आहे असे म्हणता येते. स्वेदन म्हणजे शरीरातील विषद्रव्ये घामावाटे काढून टाकणे. स्वेदन हे बहुतांशी वेळेला अग्नीच्या, उष्णतेच्या साहाय्याने केले जाते.

स्वेदनाचे फायदे

वातदोष व कफदोषाचे शमन होते.

शरीरातील अशुद्धी शिथिल होऊन शरीराबाहेर जाण्यास प्रवृत्त होतात.

शरीरावयव मृदू होतात, त्यांच्यातील कोरडेपणा कमी होतो.

सांध्यांमध्ये लवचिकता उत्पन्न होते, सांध्यांची हालचाल सहजतेने होण्यास मदत मिळते.

अग्नी प्रदीप्त होतो.

त्वचा कोमल व शुद्ध होते.

जेवणामध्ये रुची वाढते.

स्रोतसे शुद्ध होतात, शरीराला हलकेपणा प्रतीत होतो.

अतिरिक्‍त मेदधातू कमी होण्यास मदत मिळते.

अतिनिद्रा, झापड कमी होते, उत्साह अनुभूत होतो.

पंचकर्माच्या आधी शरीराची जी पूर्वतयारी केली जाते त्यातही स्वेदनाचे योगदान महत्त्वाचे असते.

चरकसंहितेमध्ये अग्नीच्या मदतीने करावयाचे 13 प्रकार सांगितले आहेत. यातील मुख्य प्रकारांची माहिती आपण घेणार आहोत. तत्पूर्वी स्वेदनाचे फायदे काय आहेत हे बघू या.

स्तंभगौरवं शीतघ्नं स्वेदनं स्वेदकारकम्‌ ।

….चरक सूत्रस्थान

शरीरातील जखडण, जडपणा, थंडपणा ज्यामुळे दूर होतो, त्याला स्वेदन असे म्हणतात.

वसंतोत्सवाची सुरुवात धूलिवंदनाने होते, म्हणजेच होळी उन्हाळ्याच्या सुरुवातीला येते. शिशिरामध्ये थंडीमुळे वाढलेला वात, साठलेला कफ आणि नंतर येणाऱ्या वसंतामध्ये प्रकुपित होणारा कफ यांचे संतुलन करण्यासाठी बरोबर या काळात होळीची योजना केलेली आढळते. धूलिवंदनाच्या दिवशी होळीची रक्षा (राख) अंगाला लावली जाते. एरंड, नारळ, शेणाच्या गोवऱ्या, नैवेद्यासाठी तयार केलेली पुरणपोळी, तूप वगैरे द्रव्यांचा संस्कार असणारी रक्षा अंगाला लावणे हे सुद्धा आयुर्वेदाच्या दृष्टीतून जणू उद्वर्तनासारखा उपचारच असतो. अशी रक्षा जंतुघ्न असते, त्वचेसाठी संरक्षक असते. भारतीय संस्कृतीप्रमाणे, परंपरेप्रमाणे धूलिवंदनाच्या दिवशी

चंदनाच्या गंधात आंब्याचा मोहोर मिसळून तयार केलेले पेय प्राशन करण्यास सांगितलेले आहे. चंदन शीतल असते हे आपण जाणतोच. उन्हाळ्यातील उष्णतेचे योग्य प्रकारे नियमन होण्यासाठी चंदन उपयोगी असते. आंब्याचा मोहोरही अनेक औषधी गुणांनी उपयुक्‍त असतो.

आम्रपुष्पमतीसारकफपित्तप्रमेहनुत्‌ ।असृग्दरहरं शीतं रुचिकृत्‌ ग्राहि वातलम्‌ ।।….भावप्रकाश

आंब्याचा मोहोर कफ-पित्तदोष कमी करतो, थंड असतो, रुची वाढवतो, वातूळ असतो. जुलाब, प्रमेह, पाळीच्या वेळचा अतिरक्‍तस्राव यांच्यावर उपयोगी असतो. वसंतातील कफप्रकोप आणि वातावरणातील उष्णता यांचा त्रास होऊ नये यासाठी याप्रकारचे पेय घेणे उपयुक्‍त असते. चरकसंहितेत अग्नीच्या साहाय्याने करावयाच्या स्वेदनाचे जे अनेक प्रकार सांगितले आहेत, त्यातील होळीशी मिळता-जुळता स्वेदनप्रकार म्हणजे जेन्ताक स्वेदन होय.

जेन्ताक स्वेदन

यात काळ्या किंवा पिवळ्या मातीने युक्‍त प्रशस्त जमीन निवडली जाते. या जमिनीवर गोलाकार कुटी बनवली जाते. या कुटीच्या भिंती मातीच्या बनविलेल्या असतात, हवा आत-बाहेर जाण्याच्या दृष्टीने भिंतींना अनेक कवडसे असतात. भिंतीला लागून बसण्यासाठी चौथरा बनविलेला असतो. या कुटीच्या मध्यभागी एरंड, खैर, अश्‍वकर्ण वगैरे वातघ्न लाकडे पेटवून अग्नी तयार केला जातो. लाकडे नीट पेटली आणि धूर येणे बंद झाले की या कुटीत प्रवेश करायचा असतो. प्रवेश करण्यापूर्वी व्यक्‍तीने अंगावर तेल लावायचे असते आणि अंगावर पातळ सुती कापड घ्यायचे असते. कुटीत गेल्यावर भिंतीला लागून बनविलेल्या चौथऱ्यावर सुखपूर्वक झोपून घाम येईपर्यंत व शरीर हलके होईपर्यंत शेक घ्यायचा असतो.

बाष्पस्वेदनाच्या साहाय्याने स्वेदन घेणे आणि याप्रमाणे अग्नीच्या उष्णतेने घाम आणवणे यात फरक असतो. अग्नीच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये होणारे स्वेदन अधिक तीव्र असते, तसेच अधिक गुणकारी असते. संपूर्ण बंद खेलीत स्वेदन घेणे आयुर्वेदात सांगितलेले नाही.

इतर पारंपरिक स्वेदनाच्या पद्धती पुढीलप्रमाणे होत,

अश्‍मघन स्वेदन

व्यक्‍ती व्यवस्थित झोपू शकेल अशा उंचीची व जाडीची दगडाची शिळा निवडावी. या शिळेवर एरंड, खदिर, अर्जुन वगैरे वातशामक गुणाच्या वनस्पतींची लाकडे जाळावीत. शिळा गरम झाली की लाकडे काढून टाकावीत, गरम पाण्याने शिळा धुवून घ्यावी व त्यावर रेशमी किंवा सुती कापड टाकून झोपावे. वरून दुसरे रेशमी किंवा सुती कापड घ्यावे.

कर्षु स्वेद

खाटेच्या चार पायांच्या मध्यात खड्डा खणावा. हा खड्डा शक्‍य तितका मोठा असावा. या खड्ड्यात धूर न येणारी, वातशामक वनस्पतींची लाकडे टाकून पेटवावीत. धूर येणे बंद झाले की खाटेवर एरंड, निर्गुडी वगैरे वातशामक वनस्पतींची पाने अंथरून त्यावर सुखपूर्वक झोपून शेक घ्यावा.

कुंभी स्वेद

वातशामक औषधांचा काढा एका मडक्‍यात भरावा. हे मडके जमिनीमध्ये अर्धे किंवा एक तृतीयांश पुरावे. मडक्‍याच्या वर खाट ठेवावी, खाटेवर व्यक्‍तीने झोपावे. आता दगड किंवा लोखंडाचा गोळा तापवून मडक्‍यातील काढ्यात टाकावा व वाफ येऊ द्यावी. या वाफेने संपूर्ण अंगाला शेक लागू द्यावा.

कुटी स्वेद

गोलाकार कुटी बांधावी. कुटीच्या भिंती जाड असाव्यात. भिंतींना आतल्या बाजूला कुष्ठ, अगरू वगैरे उष्ण वीर्याच्या वनस्पतींचे लेप लावावेत. कुटीच्या मध्यभागी खाटेवर जाड उबदार अंथरूण घालावे, खाटेच्या खाली धूर न येणारी पेटवलेली लाकडे भरलेली घमेली ठेवावी. खाटेवर झोपून अंगावर गरम पांघरूण घेऊन सुखपूर्वक शेक घ्यावा.

कूप स्वेद

ज्या ठिकाणी फार वारा नाही, तेथे खाटेच्या आकारापेक्षा थोडा लहान पण खोल खड्डा खणावा. खड्डा नीट स्वच्छ करून घेतल्यानंतर त्यात हत्ती, घोडे, गाय, गाढव, उंट यांची सुकलेली लीद (शेण) टाकून आग लावावी, धूर येईनासा झाल्यावर खड्ड्यावर खाट ठेवून त्यावर जाडसर अंथरूण टाकून सुखपूर्वक शेक घ्यावा.

—- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: