Skip to content

अन्नयोग

जुलै 9, 2009

रोजच्या आहारात असाव्यात अशा बऱ्याचशा फळभाज्यांचे गुणधर्म आपण पाहिले. आज आपण प्रकृती व दोषांचा विचार करून मग सेवन कराव्या अशा काही भाज्यांची माहिती पाहणार आहोत.
वांगे
वृन्ताकं स्वादु तीक्ष्णोष्णं पाके कटु च दीपनम्‌ ।
अपित्तलं लघु क्षारं शुक्रलं ज्वरनाशनम्‌ ।।
…निघण्टु रत्नाकर
वांगे चवीला गोड, स्वादिष्ट असले तरी गुणाने तीक्ष्ण असते, वीर्याने उष्ण असते, तसेच विपाकाने तिखट असते. पचायला हलके असले तरी क्षारयुक्‍त असते. थोड्या प्रमाणात खाल्ले तर पित्तकर नसते, शुक्रप्रवर्तक असते.
वांगे तीक्ष्ण, उष्ण व विपाकाने तिखट असल्याने रक्‍तदोष वा त्वचाविकार असणाऱ्यांसाठी अपथ्यकर असते, असा वृद्धवैद्याधार आहे.
ढोबळी मिरची
नावाप्रमाणे मोठी असणारी ही भाजी मिरचीचाच एक प्रकार आहे. चवीला तिखट, कडवट असणारी ही भाजी पित्त-वातकर असते. शरीरात रुक्षता वाढविणारी असते. त्यामुळे वाताचा त्रास असणाऱ्यांनी, आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी शक्‍यतो ही भाजी खाणे टाळणे उत्तम. त्वचाविकार असणाऱ्यांनी किंवा अंगावर पित्त उठण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनीही ढोबळी मिरची नियमितपणे खाऊ नये.
गवार
बाकुचीशिम्बिका रुक्षा वातला मधुरा गुरुः ।
सरा कफकारी चाग्निदीपनी पित्तनाशिनी ।।
… निघण्टु रत्नाकर
गवारीच्या शेंगा गुणाने रुक्ष, तसेच पचायला जड असतात. चवीला गोड असल्या तरी वातदोष वाढवणाऱ्या असतात. सारक असतात. कफ वाढवितात. कोवळ्या असताना योग्य प्रमाणात खाल्ल्या असता अग्निदीपन करतात व पित्तदोष कमी करतात.
गवारीच्या शेंगा जून झाल्या असता अधिकाधिक कोरडेपणा वाढवणाऱ्या होतात. त्वचारोगात, वातरोगात, मूत्रमार्गात जंतुसंसर्ग होण्याची प्रवृत्ती असताना गवार खाणे टाळणे चांगले.
घेवडा / फरस बी
ग्रामजा वातला रुच्या तुवरा मधुरा मता ।
मुखप्रिया कण्ठशुद्धिकारिणी ग्राहिणी मता ।।
… निघण्टु रत्नाकर
घेवडा वात वाढवतो. चवीला गोड-तुरट असून, रुचकर असतो. घेवड्याच्या कोवळ्या शेंगा कंठशुद्धी करण्यास मदत करतात. मलप्रवृत्ती बांधून ठेवण्यास मदत करतात. मात्र जून शेंगांमुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
वाताचा त्रास असणाऱ्यांनी घेवडा काळजीपूर्वक खावा.
कोबी – फ्लॉवर
या भाज्यांचा ग्रंथात पक्का उल्लेख सापडत नाही, पण या भाज्यांच्या सेवनामुळे पोटात वायू धरतो, असा अनेकांचा अनुभव असतो. मूत्रासंबंधी काहीही तक्रार असताना या भाज्या अपथ्यकर ठरतात. आकार मोठा व्हावा म्हणून वापरली जाणारी खते, पानांना कीड लागू नये म्हणून वरून फवारली जाणारी रासायनिक द्रव्ये यांचा परिणाम या भाज्या धुतल्या, शिजवल्या तरी जाऊ शकत नाही. शिवाय या प्रकारच्या अनैसर्गिक प्रक्रियेतून तयार झालेले कोबी, फ्लॉवर निःसत्त्वही असतात. म्हणून सहसा बाजारात मिळणारे मोठ्या आकाराचे व सहज कीड लागू शकणारे कोबी- फ्लॉवर अपथ्यकर समजावे लागतात.
भूमिछत्र – मश्रूम
आजकाल मश्रूम खूप प्रचलित झाल्याचे दिसते. आयुर्वेदाच्या ग्रंथात मश्रूमला “भूमिछत्र’ म्हटलेले आहे.
सर्वे संस्वेदजाः शीता दोषलाः पिच्छिलाश्‍च ते ।
गुरवश्‍छर्द्यतीसार- ज्वरश्‍लेष्मामयप्रदाः ।।
… भावप्रकाश
सर्व प्रकारचे मश्रूम दोषवर्धक, बुळबुळीत, चिकट असतात. ते पचायला जड असून त्यामुळे उलटी, जुलाब, ताप किंवा इतर कफविकार उत्पन्न होऊ शकतात. त्यातल्या त्यात स्वच्छ ठिकाणी उगवलेले मश्रूम थोडे कमी दोषकारक असतात. जमिनीवर, लाकडावर, झाडावर, तसेच गोमयाच्या ढिगावर मश्रूम उगवतात, असाही उल्लेख भावप्रकाशात आहे. काही मश्रूम विषारीही असतात. खाण्यास योग्य मश्रूम पारखून घेणे आवश्‍यक असते. कारण मश्रूममध्येही चिकटपणा, जाडपणा वेगवेगळा असतो.
एकंदरच मश्रूममुळे ताकद मिळत असली तरी ते एक प्रकारचे जडान्न असल्याने अपथ्यकरच समजले जातात.
शेवग्याच्या शेंगा
शेवग्याच्या शेंगांची भाजी करण्याची पद्धत नसली तरी आमटीत, पिठल्यात शेवग्याच्या शेंगा टाकणे पथ्यकर असते.
शिम्बी चास्याग्निदीपनी ।
तुवरा स्वादु मधुरा कफपित्तज्वरक्षयान्‌ ।
कुष्ठशूलश्‍वासगुल्मनाशिनी च प्रकीर्तितः ।।
… निघण्टु रत्नाकर
शेवग्याच्या शेंगांमुळे अग्नीचे दीपन होते. चवीला स्वादिष्ट असणाऱ्या या शेंगांमुळे कफ-पित्तदोषाचे शमन होते. क्षयरोग, ताप, त्वचारोग, शूल, दमा, गुल्म वगैरे व्याधींमध्ये शेवग्याच्या शेंगा हितकर असतात.
एकंदर वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी, जंत होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करणे चांगले असते.
शेवग्याच्या फुलांचीसुद्धा भाजी केली जाते. ती डोळ्यांसाठी विशेष उपयुक्त असते.
डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405
Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: