Skip to content

"देण्या”ची जाणीव देणारा मॉर्निंग वॉक

मे 26, 2009

“मॉर्निंग वॉक” ही कल्पना जरी खूप आकर्षक असली, तरी ती कृतीत आणणं हे महाकठीण काम. याचा अनुभव मी पुरेपूर घेतला आहे. मी “मॉर्निंग वॉक’ला जाईन असं मला स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं. मला साधं पित्त झाल्याचं निमित्त झालं. ती बातमी सोसायटीत पसरली.
माझा अशक्तपणा हा विषय माझ्यापुरता मर्यादित न राहता त्याला सार्वजनिक रूप प्राप्त झालं आणि एके दिवशी भल्या सकाळी कॉलबेल वाजली. दार उघडायच्या आत अगदी जोरात अधिकारवाणीने मारलेली हाक आली, “काय विनायकराव! अरे कसलं पित्ताचं दुखणं घेऊन बसला आहात? आळस झाडून “मॉर्निंग वॉक”ला चला माझ्याबरोबर! प्रकृती कशी ठणठणीत होते पाहा!”
तात्या सान्यांना समोर पाहताच माझ्या पोटात गोळा आला. ते बोलल्याप्रमाणेच वागत असत. त्यांच्या हुकमी आवाजातील हुकमापुढे माझं काहीच चालणार नाही याची खात्रीच होती. ते पुढे म्हणाले, “अरे! गेली १७ वर्षे “मॉर्निंग वॉक”ला जातो आहे मी! एका पैचही औषध लागत नाही मला. प्रकृती बघ कशी ठणठणीत आहे! वहिनी, मी यांना आजपासून रोज नेणार आहे, समजलं का!’ खरोखरच मला तयार होऊन त्यांच्याबरोबर बाहेर पडणं नाईलाजाने भाग पडलं.
एक मात्र खरं, की नंतर मला खूप इंटरेस्ट निर्माण झाला “मॉर्निंग वॉक’मध्ये! सुमारे १५-२० जणांचा तो ग्रुप होता. कुणी काठी घेऊन चालणारे, कुणी मफलर गुंडाळून चालणारे, कुणी “नी कॅप’ लावणारे, कुणी कर्णयंत्र लावणारे, कुणाला स्पॉंडिलिसीसचा पट्टा तर कुणाला स्वेटर! अनेक तऱ्हा होत्या. लहानमोठी दुखणी होती काहींना, परंतु एक गोष्ट मात्र निश्‍चित, सर्वांची मनं उल्हासित, अगदी ताजी टवटवीत होती. हसत खिदळत तो ग्रुप चालला होता अगदी मजेत.
बरेचसे माझ्या ओळखीचे तर काही अनोळखी, पण नंतर आमच्या सर्वांचीच मनं आपुलकीच्या धाग्यांनी घट्ट विणली गेली. एकमेकांच्या सुखदुःखात आम्ही अजाणतेपणाने मिसळून जात असू आणि आपल्या अडीअडचणी, दुःखं, कौटुंबिक प्रश्‍न, तेवढ्या वेळेपुरते तरी पूर्णपणे विसरून जात असू. आयुष्यातील जुने अनुभव, नोकरीतील चांगल्या-वाईट आठवणी, मान-अपमानाचे प्रसंग, नातेसंबंधांतील तणाव, राजकारण, भ्रष्टाचार, शिक्षण क्षेत्रातील, संरक्षण व्यवस्थेतील गोंधळ इत्यादींपैकी कोणत्याही गोष्टींवरील चर्चा वर्ज्य नव्हती.
आम्ही प्रत्येक जण निरनिराळ्या क्षेत्रातले असल्यामुळे गप्पांना आणि अनुभवांना तोटा नव्हता. आम्ही सर्व जण मिळून एकमेकांचे वाढदिवस, नातवंडांचे वाढदिवस साजरे करतो. एका दिवसाची एखादी सहल काढून निसर्गाच्या सान्निध्याचा आस्वाद मनमुराद लुटतो. बागेत जाऊन लहान मुलांना खेळवतो. दोन जण मेडिकलच्या दुकानातून आवश्‍यक ती औषधं आणून देतात, आजारी माणसाकडे हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णाला मदत करण्यासाठी आम्ही तत्पर असतो. लहान मुलांना शाळेत पोहोचवणं, बॅंकेची कामं करणं, भाजी आणून देणं अशा प्रकारची कामं आमचं “मॉर्निंग वॉक’ मंडळ करतं.
आपण समाजाचा एक महत्त्वाचा घटक असून, समाजाचं आपण काही देणं लागतो, ते देऊन टाकणं आवश्‍यक आहे. अशा प्रकारची उदात्त भावना आमच्या मनात “मॉर्निंग वॉक”मुळेच वाढीला लागली आहे हे कबूल करायलाच पाहिजे.
– अरुण भालेराव, डोंबिवली
Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: