Skip to content

संक्रांत सुरक्षेवर!!

जानेवारी 4, 2009

संक्रांत सुरक्षेवर!!

(डॉ. श्री बालाजी तांबे)
आयुर्वेदीय संकल्पनेतील जठराग्नीवर व इतर शारीरिक क्रिया करण्यास जबाबदार असलेल्या अग्नीवरही (म्हणजेच हॉर्मोन्सवर) संक्रांतीचा परिणाम होत असावा. स्त्रियांच्या बाबतीत तर आरोग्याचे असंतुलन अधिक होत असल्यामुळे संक्रांतीच्या काळात स्त्रियांसाठी अनेक व्रते सांगितलेली असतात.

यंदाची संक्रांत भारतीयांच्या सुरक्षिततेवर आलेली दिसते. संक्रमण, आक्रमण अशा शब्दांची मनुष्याला जरा भीतीच वाटते. पूर्वीच्या काळी भारताच्या उत्तर भागात तसेच पश्‍चिम किनाऱ्यावर अनेक आक्रमणे झाली. जी शक्‍ती नकोशी आहे किंवा ज्या शक्‍तीमुळे विनाश होणार आहे ती शक्‍ती कार्यरत होते तेव्हा “आक्रमण’ असे म्हटले जाते. अशा आक्रमणामुळे होणाऱ्या बदलाची भीती वाटत असावी.

आकाशगंगेतील तीस अंशाच्या एका भागास मकर असे नाव दिलेले आहे. त्या राशीचा अधिपती शनी आहे न तो थंड व मंद गतीचा असतो. ही राशी सूर्याला असुविधा करणारी असते. सूर्य राशीत प्रवेश करतो त्या काळाला संक्रमण काळ असे म्हटले जाते व या कालात उत्पन्न झालेल्या शक्‍तीला संक्रांती असे म्हटले जाते. भारतीय ज्योतिष व पंचांग या शास्त्रांमध्ये ह्या संक्रांतीदेवीचे स्वरूप वर्णन करून दाखविलेले असते. संक्रांतीदेवीचा आकार, तिने वापरलेली वस्त्रे, ती कुठल्या दिशेकडून येत आहे, कुठल्या दिशेकडे जात आहे वगैरे सविस्तर वर्णने व त्या शक्‍तीचे फायदे-तोटेही वर्णिलेले असतात.

ह्या वर्षी १४ जाने. २००९ मंगळवार ह्या दिवशी पहाटे सहा वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. ही संक्रांत बाल वयाची असून तिने पांढरे वस्त्र परिधान केलेले आहे, कस्तुरीचा टिळा लावला आहे, ती अन्नभक्षण करत आहे व तिने प्रवाळ रत्न धारण केलेले आहे वगैरे वर्णने आपल्याला सापडेल एखाद्यावर काही संकट आल्यास त्याच्यावर संक्रांत आली असे म्हटले जाते.

सूर्य सर्व जगाला उष्णता व शक्‍ती देणारा ग्रह असल्याने त्याचा स्वभाव साहजिकच उष्ण व गतिमान आहे संक्रांत थंडीच्या दिवसात असल्याने त्या काळात सूर्याची उष्णता मिळत नाही. त्यामुळे या काळात अग्नीचे महत्त्व वाढलेले असते.

या काळात उष्णता देणाऱ्या अग्नीबरोबरच आयुर्वेदीय संकल्पनेतील जाठराग्नीवर व इतर शारीरिक क्रिया करण्यास जबाबदार असलेला अग्नीवर (म्हणजेच हॉर्मोन्सवर) संक्रांतीचा परिणाम होत असावा. स्त्रियांच्या बाबतीत तर हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे हॉर्मोन्सचे व पर्यायाने स्त्रीआरोग्याचे असंतुलन अधिक होत असल्यामुळे संक्रांतीच्या काळात स्त्रियांसाठी अनेक व्रते सांगितलेली असतात.

काळ्या वस्त्रात सूर्यांच्या उष्णतेचे शोषण अधिक प्रमाणात होते म्हणून संक्रांतीला काळी वस्त्रे घालण्याची प्रथा आहे. सकाळच्या वेळी लवकर जेवण्याची प्रथा आहे ज्यामुळे अन्नाचे पचन नीट होण्याच्या दृष्टीने नीट वेळ मिळतो. जेवणात खिचडी, गुळाची पोळी खाण्याचा प्रघात दिसतो.

धुंधुर्मास म्हणून सकाळी सूर्योदयाच्या वेळी तूप घालून गरमागरम खिचडी, गूळपोळी, वांग्याचे भरीत वगैरे जेवणात घेण्याचा प्रघात असतो.

नाश्‍त्यासाठी भरपूर खावे असे म्हणणाऱ्यांना सकाळच्या वेळी जेवण घेणे नक्कीच आवडेल. आयुर्वेदिक पद्धतीने सिद्ध केलेल्या तिळाच्या तेलाचा अभ्यंग करणे, तीळ वाटून अंगाला लावणे, गूळ व तिळापासून केलेले लाडू खाणे असे अनेक आचार-विचार प्रचारात दिसतात. तसेच या काळात गरम शेगडीवर परात ठेवून तिळावर साखर चढवून हलवा केलेला असतो.

अशा रीतीने या दिवसात गरम शेगडीभोवती बसणे, शेकोटी पेटवून त्याभोवती बसणे वगैरे आचरणही सुचविलेले दिसते. शिवाय मानसिक ऊब वाढण्याच्या दृष्टीने आजूबाजूच्या स्त्रियांना आपल्या घरी बोलावून त्यांना काहीतरी भेट वस्तू देणे अशा आचरणातून एकूणच संबंधात गोडवा आणण्याचा प्रयत्न केला जातो.

घराबाहेर जास्तीत जास्ती राहून सूर्याची शक्‍ती जास्त मिळावी या हेतूने गच्चीवर वगैरे पतंग उडविण्यासारखी पद्धत रूढ झालेली दिसते. पतंग उडविणे हे एका दृष्टीने आकाशध्यानच आहे. नुसच्या मोकळ्या आकाशाकडे पाहणे तेवढे सोपे व मनाला फारसे आवडण्यासारखे नसल्याने सुंदर रंगीत पतंग आकाशाच्या कपाळावर ठेवून त्यावर त्राटक करण्याची क्रिया म्हणजे पतंग उडविण्याचा खेळ. अर्थात एकमेकाचे पतंग कापल्याशिवाय आरडाओरडा होत नाही व खेळाला जोशही येत नाही.

मानवाच्या आरोग्याची प्रत्येक ऋतूशी सांगड घालून किंवा विश्‍वात घडणाऱ्या घटना व ग्रहमानात होणारे बदल लक्षात घेऊन सांगोपांग व वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून आयुर्वेदाने सर्वसामान्यासाठी निरनिराळे उत्सव, कुळधर्म, कुलाचार निश्‍चित करून ठेवलेले दिसतात. त्यापैकी संक्रांत हा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे. संक्रांतीच्या वर्णनावरून वर्षात पाऊस किती पडेल, धान्य किती पिकेल, मारामाऱ्या होतील का लोक शांततेने जीवन जगतील वगैरे भाकिते करण्याचाही प्रयत्न केलेला दिसतो.

संक्रांतीच्या निमित्ताने दानधर्म करावा हा प्रघात सामाजिक बांधिलकीसाठी अत्यंत उपयोगी ठरतो. तसेच अपापसातील संबंधात वा मैत्रीत आलेला कडूपणा दूर करून “तिळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणून पुन्हा गोड संबंध प्रस्थापित करून प्रेम वाढविणे हा तर या सणाचा सर्वोच्च बिंदू!! थंडी घालविण्यासाठी लागते ऊब व तिळगूळ घ्या गोड बोला म्हणून मारलेली “जादूकी झप्पी (मिठी)’ हे काम उत्तम करते.

– डॉ. श्री बालाजी तांबे.

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: