Skip to content

तिळगूळ का खायचा?

जानेवारी 4, 2009
तिळगूळ का खायचा?

(डॉ. श्री बालाजी तांबे)
थंडीने गारठून टाकणाऱ्या हेमंत ऋतूत दूध व उसापासून तयार केलेले विविध पदार्थ खावेत, गरम पाणी प्यावे, तेल, वसा वगैरे स्निग्ध पदार्थ खावेत, अंगाला अभ्यंग करावा, स्निग्ध द्रव्यांपासून बनविलेली उटणी लावावीत, डोक्‍यावर तेल लावावे, अंगावर ऊन घ्यावे, असे आयुर्वेद सांगतो. संक्रांतीला आपण नेमके हेच करतो.

नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत. तिळगूळ खायला मिळणार म्हणूून लहान मुले आनंदात असतात तर स्त्रिया हळदी-कुंकू समारंभाची, संक्रांतीनिमित्त कोणत्या गोष्टी लुटायच्या याची योजना करत असतात, नववधू तसेच नवजात बाळासाठी दागिने आणण्याची लगबग सुरू असते, दागिने पण तिळ-साखरेच्या हलव्याचेच असतात.

मुले-बाळे, पुरुषमंडळी पतंग उडविण्यासाठी उत्सुक असतात. एकंदर संक्रांत हा उत्साहपूर्ण व मैत्रीपूर्ण सण म्हणता यावा.
आयुर्वेदिक दृष्ट्या विचार करायचा झाला तर संक्रांत येते थंडीच्या दिवसात म्हणजे हेमंत ऋतूत. हेमंतानंतर येतो शिशिर ऋतू, जो आदान काळातला पहिला ऋतू असतो.

आदानाचे वैशिष्ट्य म्हणजे “रौक्ष्यं आदानजम्‌’ अर्थात आदानकाळात रुक्षता वाढू लागते, शिवाय शिशिरात थंडीचे प्रमाण खूप वाढणार असते. थंडीपाठोपाठ रुक्षता वाढतेच. संक्रांतीच्या दिवशी केल्या जाणारे सर्व रीतिरिवाज रुक्षता कमी करणारे व थंडीचे निवारण करणारे असतात.

आयुर्वेदाने फक्‍त संक्रांतीच्या दिवशीच नाही तर संपूर्ण हेमंत व शिशिर ऋतूत असेच शीतता व रुक्षता कमी करणारे उपाय योजण्यास सांगितले आहेत.
चरकसंहितेमधील या सूत्रांवरून हे स्पष्ट होईल.

गोरसानिक्षुविकृतीर्वसा तैलं नवौदनम्‌ ।
हेमन्ते।भ्य़स्यतस्तोयमुष्णं चायुर्न हीयते ।।
अभ्यंगोत्सादनं मूर्ध्नि तैलं जेन्ताकमातपम्‌ ।
… चरक संहिता

हेमंत ऋतूत दूध व उसापासून तयार केलेले विविध पदार्थ खावेत, गरम पाणी प्यावे, तेल, वसा वगैरे स्निग्ध पदार्थ खावेत, अंगाला अभ्यंग करावा, स्निग्ध द्रव्यांपासून बनविलेली उटणी लावावीत, डोक्‍यावर तेल लावावे, अंगावर ऊन घ्यावे.

संक्रांत साजरी करताना आपण नेमक्‍या याच गोष्टी करत असतो. उसापासून बनविलेल्या गुळाशिवाय संक्रांत पूर्ण होणार नाही. थंडीच्या दिवसात जे स्निग्ध पदार्थ खायचे, त्यात तीळ अग्रणी ठरावेत. म्हणूनच संक्रांतीला “तिळगूळ घ्या गोड बोला’ हा जणू परवलीचा शब्द असतो.

संक्रांतीच्या दिवशी तिळाचे महत्त्व इतके की त्यांचा होता होईल तेवढा अधिकाधिक उपयोग करण्याची पद्धत असते. तीळ-गूळ खाण्याबरोबर तीळमिश्रित पाण्याने स्नान करणे, तिळाचे उटणे अंगाला लावणे, तीळ अग्नीवर टाकून धूप करणे, तीळ वाटणे वगैरे निरनिराळ्या मार्गांनी तीळ वापरायचे असतात.

आयुर्वेदाने सांगितलेला अभ्यंगही औषधांनी सिद्ध तीळ तेलाचाच करायचा असतो. स्निग्ध द्रव्यांचे उटणे बनविताना त्यात त्वचेला हितकर तीळ अग्रणी असावेच लागतात. पतंग उडविण्याच्या निमित्ताने अंगावर ऊनही घेतले जाते.
तीळ, गूळ स्वयंपाकघरात बऱ्याचशा प्रमाणात वापरले जातातच पण औषध म्हणूनही त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असतो.
उष्णस्त्वच्यो हिमः स्पर्शः केश्‍यो बल्यस्तिलो गुरुः ।
अल्पमूत्रः कटु पाके मेधाग्निकफपित्तकृत्‌ ।।
… वाग्भट सूत्रस्थान

तीळ वीर्याने उष्ण पण स्पर्शाला शीतल असतात, त्वचेला तसेच केसांना हितकर असतात, ताकद वाढवितात, मुत्राचे प्रमाण कमी करतात, अग्नी तसेच मेधा (ग्रहणशक्‍ती) वाढवितात, कफ-पित्त वाढविणारे असतात.

पांढरे व काळे असे तिळाचे दोन प्रकार असतात. यातील काळे तीळ औषधाच्या दृष्टीने अधिक गुणकारी असतात.

औषध म्हणून तिळाचा उपयोग अनेक प्रकारांनी केला जातो.
– मूळव्याधीमुळे विशेषतः वात-कफ असंतुलनामुळे गुदभागी सूज, वेदना असता तिळाचा कल्क लावण्याने बरे वाटते.

कल्कस्तिलानां कृष्णानां शर्करा पांचभागिकः ।
अजेन पयसा पीतः सद्यो रक्‍तं नियच्छति ।।
… वाग्भट चिकित्सास्थान

काळ्या तिळाचा कल्क एक भाग, त्याच्या पाच पट साखर हे मिश्रण बकरीच्या दुधासह योग्य प्रमाणात घेण्याने जुलाबासह रक्‍त पडणे थांबते.
– संपूर्ण तिळाचे झाड जाळून बनविलेला क्षार बकरीच्या दुधात टाकून घेणे मूतखड्यावर उत्तम असते.

– तीळ रजःप्रवर्तन वाढवणारे असतात. अंगावरून कमी जात असल्यास तिळाचा काढा गूळ घालून घेतला जातो. गर्भाशयातला वातदोष कमी करण्याच्या दृष्टीनेही तीळ उत्तम असतात. म्हणूनच बाळंतपणानंतर गर्भाशयाची शुद्धी होण्याच्या दृष्टीने तीळ-ओवा-खोबऱ्याची सुपारी खायची पद्धत आहे.
दिने दिने कृष्णतिलं प्रकुंचं समश्‍नतः शीतजलानुपानम्‌ ।
पोषो शरीरस्य भवत्यनल्पः दृढीं भवन्त्यामरणाच्च दन्ताः ।।
रोज काळे तीळ चावून खावे व वरून थंड पाणी प्यावे. यामुळे दात बळकट बनतात.

– जखमेवर तिळाचा कल्क लावला असता जखम कोरडी पडत नाही, उलट लवकर भरून येते.

– वाटलेले तीळ अंगाला लावून स्नान केले असता त्वचा स्निग्ध व सुकुमार बनते.

अर्थात तिळाचे हे सर्व उपयोग अतिशय प्रभावी असले तरी त्यांचा प्रयोग करताना तीळ उष्ण असतात हे निश्‍चितपणे लक्षात घ्यावे लागते. प्रकृती, हवामान, शरीरातले पित्तदोषाचे प्रमाण या गोष्टी लक्षात घेऊनच तिळाचा सरसकट औषधी वापर करावा.

गूळ उसाच्या रसापासून बनवितात हे सर्व जण जाणतात, पण गूळ बनविण्याच्या प्रक्रियेत उसाच्या रसावरची मळी काढणे आवश्‍यक असते. मळी काढून तयार झालेला शुद्ध गूळ चवीला मधुर, वात-पित्तशामक व रक्‍तधातूला प्रसन्न करणारा असतो.

गूळ वर्षभर ठेवून जुना झाला की मग वापरायचा असतो. नवीन गुळामुळे कफदोष वाढू शकतो, तसेच अग्नीचा अवसाद होतो. त्याउलट जुना गूळ गुणांनी श्रेष्ठ असतो.

स्वादुतरः स्निग्धो लघुरग्निदीपनो विण्मूत्रामयशोधनो रुच्यो हृद्यः पित्तघ्नो वातघ्नस्त्रिदोषघ्नो ज्वरहरः सन्ताप शान्तीप्रदः श्रमहरः पाण्डुप्रमेहान्तकः पथ्यश्‍च ।
… राजनिघण्टु

जुना गूळ चवीला गोड, रुचकर, स्निग्ध, पचायला हलका असतो, अग्नीदीपन करतो, मल-मूत्र वाढण्याने झालेले रोग दूर करतो. हृदयासाठी हितकर असतो, त्रिदोषांचे शमन करतो, ताप दूर करतो, संताप दूर करुन मन शांत करतो, क्षम नाहिसे करतो, पांडू, रक्‍ताल्पता व प्रमेह वगैरे व्याधींमध्ये पथ्यकर असतो.
थकून भागून आलेल्याला गुळाचा खडा देण्याची पद्धत असते कारण तो ताप-संताप दूर करून श्रम नाहीसे करू शकतो.

गूळ रक्‍तधातूपोषक व गर्भाशयाची शुद्धी करणारा असतो. त्यामुळे बाळंतपणानंतर घेण्यास उत्तम असतो.

थंडीच्या दिवसात जेवणात तूप-गूळ खाण्याने थंडीचे निवारण होते, शिवाय ताकद वाढते.

तिळाप्रमाणेच गुळाचीही आयुर्वेदाने खूप स्तुती केलेली असली तरी गूळही उष्ण असतो,तो हे लक्षात घ्यावे लागेल. शिवाय गूळ पचला नाही किंवा अशुद्ध स्वरूपातला गूळ सेवन केला तर त्यामुळे जंत होऊ शकतात, मेदधातू वाढू शकतो.

संक्रांतीच्या दिवशी जेवणात गुळाची पोळी असतेच. ही पोळी कशी बनवावी व तिचे काय फायदे होतात हे आयुर्वेदाने याप्रमाणे सांगितले आहे,

गोधूमचूर्णं क्षिप्ताज्यं जलेनार्द्रं विमर्दयेत्‌ ।
मृदोस्तस्मात्संप्रगृह्य तुल्यां पूगफलेन च ।।
कृत्वा पर्पटिकां तस्य शर्कराचूर्णगर्भिताम्‌ ।
गुटिं बध्वा पिधायास्यं वेल्लयेत्पूर्णपीठके ।।
पर्पटेन समां कृत्वा घृते सुविपचेत्ततः ।
सा गुडोरी गुरुर्वृष्या शुक्रला वातपित्तनुत्‌ ।
एतादृशी गुडस्यापि भवतीति सुनिश्‍चितम्‌ ।।
…निघण्टु रत्नाकर

गव्हाच्या पिठात तुपाचे मोहन घालून पाण्यासह मळावे. मऊसर मळले गेले की सुपारी एवढी गोळे करावेत. गोळा लाटून लहानशी पोळी बनवावी. यात गुळाचे किंवा साखरेचे पुरण भरून मोदक बनवून त्याचा पुन्हा गोळा करावा व लाटावा. लाटलेली पोळी तुपावर व्यवस्थित शेकावी. अशी ही गुडोरी (गूळ-पोळी) वात-पित्तशामक असते, पचायला जरी थोडी जड असली तरी शक्रधातूला पोषक असते.

संक्रांतीच्या निमित्ताने संपूर्ण हेमंत-शिशिर या ऋतूत करण्यासाठी सुरू होते सूर्यस्नान. आकाशध्यान व सूर्यस्नान करण्यासाठी गच्चीवर उघड्या आकाशाखाली पतंग उडविण्यासाठी लहान थोर सर्वच जातात व हा सण आनंदाने साजरा करतात.

– डॉ. श्री बालाजी तांबे

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: