Skip to content

नोव्हेंबर 20, 2008

साधा ऊर्जेचे संतुलन

(डॉ. श्री बालाजी तांबे)
ऊर्जा तयार होण्यासाठी आवश्‍यक असणारे मुख्य शरीरतत्त्व म्हणजे जठराग्नी. सूर्याचे शरीरातील प्रतीक मानल्या जाणाऱ्या या जठराग्नीची निगा राखणे तेवढे आपल्या हातात असते. त्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे प्रकृतिनुरूप उचित अन्नपान करणे. म्हणूूनच आहार कसा असावा, किती प्रमाणात घ्यावा, कधी घ्यावा यासोबतच त्याचे सेवन करताना मानसिक स्थिती कशी असावी अशा अनेक अंगांची चर्चा आयुर्वेदाने केलेली आहे. …….
ऊर्जा म्हणजे प्राणशक्‍तीचे, जीवनशक्‍तीचे प्रकटीकरण. जीवन चालू राहण्यासाठी, प्राणाचे धारण होण्यासाठी ऊर्जा आवश्‍यक असते. पृथ्वीसाठी ऊर्जेचा मूलस्रोत असतो सूर्य. सूर्यकिरणांच्या साहाय्याने अन्नधान्याची निर्मिती होते आणि अन्नधान्यातूनच सर्व जिवांचे पोषण होत असते. मात्र, या अन्नधान्यातून, मग ते पाणी असो, गवत असो, भाज्या-फळांच्या स्वरूपातले असो किंवा एखाद्या प्राण्याचे मांस असो, शरीरावश्‍यक ऊर्जा तयार करण्याची संरचना प्रत्येक सजीव प्राणिमात्राला लाभलेली असते. या संरचनेतला प्रमुख घटक सूर्याचे प्रतीक स्वरूपच असतो. तो म्हणजे जाठराग्नी.

आहारामध्ये असलेल्या नैसर्गिक ऊर्जेचे रूपांतर शारीरिक ऊर्जेत करण्याचे काम जाठराग्नीकडून होत असते. पचनक्रियेतून तयार झालेली ऊर्जा आपल्या प्रत्येक लहान- मोठ्या, शारीरिक-मानसिक कार्यासाठी वापरली जाते. अर्थातच जितकी अधिक व जितक्‍या चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळेल तितके शरीरव्यापार सुरळीत चालतात, आरोग्य कायम राहते. या उलट ऊर्जा कमी पडली तर अनेक समस्यांना आमंत्रण मिळू शकते. पुरेशी ऊर्जा मिळण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक म्हणजे ज्यापासून ऊर्जा मिळते तो आहार ऊर्जेने संपन्न असायला हवा आणि दुसरी म्हणजे आहारातील ऊर्जेचे शरीरव्यापारासाठी आवश्‍यक स्वरूपामध्ये रूपांतर करणारी संरचना म्हणजेच पचनक्रिया व्यवस्थित काम करायला हवी.

शरीररूपी यंत्र चालू राहण्यासाठी ऊर्जा सातत्याने मिळत राहणे अत्यावश्‍यक असते. बोलणे, धावणे, काम करणे वगैरे दृश्‍य क्रिया तसेच रक्‍ताभिसरण, मेंदूच्या क्रिया, इंद्रियांकडून ज्ञानग्रहण वगैरे शरीराच्या आत घडणाऱ्या सर्व क्रिया ऊर्जेमुळेच होत असतात. मात्र ऊर्जेचे काम इथे संपत नाही. एखाद्या यंत्राचे जुने झालेले भाग काढून त्या ठिकाणी नवीन भाग बसविले जातात त्याप्रमाणे अविरत काम करणाऱ्या शरीरातील अवयवांची झीज भरून काढण्याची जबाबदारीसुद्धा ऊर्जेवरच असते.

आहारापासून ऊर्जा तयार होण्याची क्रिया गुंतागुंतीची आहे. गुंतागुंतीची या अर्थाने की त्यात अनेक शरीरभावांचा सहभाग होत असतो. नुसते शरीरावयवच नाही तर मनाचेही यात मोठे योगदान असते. आयुर्वेदाने ऊर्जा तयार होण्याची प्रक्रिया याप्रमाणे सांगितलेली आहे.

अन्नं आदानकर्मा तु प्राणः कोष्ठं प्रकर्षति ।
… चरक चिकित्सास्थान

प्राणवायू अन्नाचा स्वीकार करून अन्न कोठ्यामध्ये पाठवायचे काम करत असतो. अन्नाचा जिभेशी स्पर्श होताक्षणीच पचनाचे, ऊर्जा बनविण्याचे काम सुरू होते. “बोधको रसनास्थायी’ म्हणजे जिभेमध्ये राहणाऱ्या बोधक कफाद्वारे अन्नाचा, अन्नातील चवींचा व गंधाचा बोध होतो आणि या ठिकाणीच ऊर्जा तयार होण्याच्या कामाला सुरुवात होते.

बोधक कफामुळे अन्नाला उचित मृदुता येते, अन्न गिळण्यास योग्य बनते व सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोधक कफाच्या सौम्यतेमुळे जाठराग्नीची किंवा पाचक पित्ताची तीक्ष्णता नियंत्रणाखाली राहू शकते.

मुखातून अन्न आमाशयात म्हणजे पोट या अवयवात आले की त्यावर क्‍लेदक कफाद्वारे क्‍लेदनाचा संस्कार होतो.

यस्त्वामाशयसंस्थितः क्‍लेदकः सो।न्नसंघातक्‍लेदनात्‌ ।
… अष्टांगहृदय सूत्रस्थान

आमाशयात राहणारा क्‍लेदक कफ अन्नसंघाताला उचित ओलावा, योग्य तेवढा मऊपणा देतो. आयुर्वेदाने ही पचनाची प्रथम अवस्था सांगितली आहे. अन्न शिजविण्यासाठी अग्नीची आवश्‍यकता असली तरी त्या अगोदर अन्नाचा पाण्यासह संयोग व्हावा लागतो. उदा. भात बनविण्यासाठी तांदळाच्या दुप्पट पाणी घालावे लागते,पोळी भाजण्यापूर्वी कणीक पाणी घालून मळून घ्यावी लागते, नुसते तांदूळ अग्नीवर ठेवले तर जळून जातील, तसेच अन्नाचा सरळ अग्नीशी संबंध आला तर अन्न भस्मसात होईल. हे टाळण्यासाठी अग्निसंस्कार होण्यापूर्वी अन्नात उचित प्रमाणात ओलावा निर्माण करण्याची ही प्रथम अवस्था असते.

यानंतरची दुसरी व महत्त्वाची अवस्था म्हणजे अन्नावर पाचकपित्ताची क्रिया होणे. ही आमाशयाच्या शेवटच्या एक तृतीयांश भागात सुरू होते व ग्रहणी (लहान आतडे किंवा डिओडिनम) संपेपर्यंत सुरू राहते. ग्रहणी हे जाठराग्नीचे स्थान आहेच, जाठराग्नीला संधुक्षित करणारा समान वायूही ग्रहणीमध्ये स्थित असतो.

अन्नं गृह्णाति पचति विवेचयति मुञ्चति ।
… अष्टांगहृदय सूत्रस्थान

क्‍लेदनसंस्कार झालेले अन्न ग्रहणीमध्ये प्रवेशित करून घेणे, जाठराग्नीद्वारा त्याचे पचन होईपर्यंत त्यास धरून ठेवणे, पचन झाल्यावर त्यातला ऊर्जायुक्‍त सारभाग निराळा काढणे व उर्वरित त्याज्य भाग पुढे ढकलणे ही सर्व कामे समान वायूमुळे होत असतात.

अशा प्रकारे समानवायू जणू पचनासाठी आवश्‍यक व्यवस्थापनाचे काम करत असतो तर पचनाचे मुख्य काम जाठराग्नीद्वारे होत असते.

जाठराग्नीची क्रिया झाली म्हणजे पचन संपले असे नाही तर यानंतरची शेवटची तिसरी अवस्था वातदोषाद्वारे पार पडत असते. ऊर्जायुक्‍त सारभाग पुढे धातूंमध्ये रूपांतरित करण्यासाठी हृदयाकडे व तेथून धात्वग्नींपर्यंत पोचविण्याचे काम वायू करतो तसेच मलभाग शरीराबाहेर टाकण्याचे कामही वायूच करतो.

“ऊर्जा’ शब्दाने डोळ्यांसमोर प्रकाश येतो, तेजस्विता प्रतीत होते. शरीराला आवश्‍यक ऊर्जा देण्याचे काम करणारा आहाररस ही “तेजोमय’ असतो असे आयुर्वेदाने सांगितले आहे.

सम्यक्‌ परिणतस्य यस्तेजोभूत सारः पोरमसूक्ष्मः स रस इत्युच्यते ।

पंचमहाभूतांनी संपन्न, षड्रसयुक्‍त, वीर्यवान, गुणसंपन्न आहाराचे योग्य पचन झाल्यानंतर जो तेजस्वी, सूक्ष्म सारपूर्ण असा रस तयार होते तो सर्व शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास सक्षम असतो.

तस्य हृदयं स्थानम्‌ ।
स हृदयात्‌ चतुर्विंशतिधमनीरनुप्रविश्‍य ऊर्ध्वगा दश दशअधोगामिन्यश्‍चतस्त्रश्‍च तिर्यग्गा कृत्स्नं शरीरमहरहस्तर्पयति वर्धयति धारयति यापयति च अदृष्टहेतुकेन कर्मणा ।
… सुश्रुत सूत्रस्थान

या रसाचे स्थान हृदय असते. तो हृदयातून धमनीद्वारा संपूर्ण शरीराला सातत्याने तृप्ती देतो, शरीराचे पोषण करतो, शरीराचे धारण करतो, शरीर-झीज भरून आणण्यास मदत करतो.

या सर्व वर्णनावरून लक्षात येते की पचनातून तयार झालेला आहाररस ऊर्जेचा श्रेष्ठ स्रोत असतो. या आहाररसाचे पुढे जसजसे सप्तधातूत रूपांतर होऊ लागते तसतसे ऊर्जेचे प्रकटीकरण होऊ लागते, सप्तधातू तयार होण्यासाठी आवश्‍यक असणारे धात्वग्नी जाठराग्नीवरच अवलंबून असतात.

अशा प्रकारे ऊर्जा तयार होण्यासाठी आवश्‍यक असणारे मुख्य शरीरतत्त्व म्हणजे जाठराग्नी होय. बाह्य जगतातील सूर्याचे प्रतीक असणारा हा जाठराग्नी स्वतः “भगवान’ आहे असे आयुर्वेदाने सांगितले आहे. भगवान या अर्थाने की जाठराग्नीवर कुणाचीही सत्ता नसते, अन्नपचनाचे काम व्यवस्थित होत राहावे यासाठी जाठराग्नीची निगा राखणे तेवढे आपल्या हातात असते. ही निगा राखण्याचा एकमेव उपाय म्हणजे प्रकृतीनुरूप उचित अन्नपान करणे. म्हणूूनच आहार कसा असावा, किती प्रमाणात घ्यावा, कधी घ्यावा वगैरे गोष्टींचे सविस्तर वर्णन आयुर्वेदात केलेले आहे.

पचनातून ऊर्जा तयार होण्यासाठी मनाचे संतुलनही खूप महत्त्वाचे असते. आयुर्वेदातल्या या सूत्रावरून हे स्पष्ट होते,

मात्रयाप्यभ्यवहृतं पथ्यं चान्नं न जीर्यति ।
चिन्ताशोकभयक्रोधदुःखशय्या प्रजागरैः ।।
… चरक विमानस्थान

मन जेव्हा चिंताग्रस्त असते, शोक, भय, क्रोध, दुःख वगैरे भावांनी असंतुलित झालेले असते तेव्हा पथ्यकर, योग्य मात्रेत खाल्लेले अन्नही पचू शकत नाही.

थोडक्‍यात मनाचे संतुलन राखले, योग्य अन्नपान करून जाठराग्नीला संपन्न अवस्थेत ठेवणे, अधिकाधिक ऊर्जा मिळू शकेल असे वीर्यवान, षड्रसपूर्ण अन्न व रसायनांचे सेवन केले तर त्यामुळे ऊर्जासंपन्न आरोग्याचा अनुभव निश्‍चितच घेता येऊ शकेल.

—————————————————————–
डॉ. श्री बालाजी तांबे यांच्याशी संपर्कासाठी टाईप करा fdoc आणि पाठवा 54321 वर
—————————————————————–

– डॉ. श्री बालाजी तांबे

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: