Skip to content

मना सज्जना

ऑक्टोबर 3, 2008

मना सज्जना

बुद्धी, संयम व स्मृती भ्रष्ट झाल्या, की व्यक्‍तीकडून अनुचित, अयोग्य कार्य घडते, त्यातून रोगाची सुरवात होते, असे प्रज्ञापराधाचे वर्णन आयुर्वेदाने केले आहे. यात मनाचा मोठा सहभाग असतो; कारण बुद्धीने योग्य काय, अयोग्य काय याचा सारासार विचार मनासमोर ठेवला, तरी प्रत्यक्ष काम करणाऱ्या इंद्रियांवर वर्चस्व मनाचेच असते. ……
शरीर व मन यांचा संबंध प्रत्येकानेच अनुभवलेला असतो. आयुर्वेदात या संबंधात सांगितले आहे,

रुपस्य सत्त्वस्य च सन्ततिर्या नोक्‍तस्तदादिर्नहि सो।
स्ति कश्‍चित्‌ ।
… चरक शारीरस्थान

शरीर व मन यांचा संबंध अनादी काळापासून चालत आलेला आहे. जेव्हापासून हे जग आहे, तेव्हापासून शरीर व मन एकमेकांशी निगडित आहेत. म्हणूनच रोग शारीरिक असो वा मानसिक, त्यावर उपचार करताना मनाला प्राधान्य द्यावे लागते. आयुर्वेदाने रोगांची तीन मुख्य कारणे सांगितलेली आहे. त्यात प्रज्ञापराध हा सर्वात महत्त्वाचा सांगितला. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, संयम व स्मृती भ्रष्ट झाल्या की व्यक्‍तीकडून अनुचित, अयोग्य कार्य घडते, त्यातून सर्व दोष बिघडतात आणि रोगाची सुरुवात होते असे प्रज्ञापराधाचे वर्णन केलेले आहे. मात्र यात मनाचा मोठा सहभाग असतो. कारण बुद्धीने योग्य काय अयोग्य काय याचा सारासार विचार मनासमोर ठेवला तरी प्रत्यक्ष काम करणाऱ्या इंद्रियांवर वर्चस्व मनाचेच असते. त्यामुळे शेवटी मनाला जे हवे तेच कार्य घडते.

यच्च अन्यदीदृशं कर्म रजोमोहसमुत्थितम्‌ ।
प्रज्ञापराधं तं शिष्टा ब्रुवते व्याधिकारणम्‌ ।।
… चरक शारीरस्थान

रज व तम गुणाने आविष्ट झालेले मन जेव्हा इंद्रियांकडून चुकीची कार्य करवून घेते तेव्हा त्याला प्रज्ञानपराध असे म्हणतात. या सर्व वर्णनावरून एक गोष्ट लक्षात येते की प्रज्ञापराध होऊ नये असे वाटत असेल म्हणजेच रोगाला आमंत्रण द्यायचे नसेल तर मन शुद्ध व सात्त्विक असायला हवे असेल तर मनाचे दोष – रज व तम – कमी व्हायला हवेत, मनावर नियंत्रण ठेवता यायला हवे. मनावर नियंत्रण कोण ठेवते हे आयुर्वेदात खालील प्रमाणे सांगितले आहे.

इन्द्रियाभिग्रहः कर्म मनसः स्वस्यनिग्रहः ।
… चरक शारीरस्थान

इंद्रियांचे संचालन करणे, इंद्रियांचे नियमन करणे, स्वतःच स्वतःवर नियंत्रण ठेवणे अर्थात अहितकर विषयांपासून स्वतःला परावृत्त करणे, ही मनाची कार्ये आहेत. म्हणजेच मनावर नियंत्रण स्वतः मनच ठेवू शकते. बऱ्याचदा आपण अनुभवतो की एखादी गोष्ट करण्याचा मोह होत असतो, बुद्धी-धृती मनाला बजावत असतात की हे करणे योग्य नाही तरीही मन जोपर्यंत मोहापासून स्वतःला परावृत्त करत नाही तोपर्यंत मनाची द्विधा स्थिती चालू राहते. मनाने बुद्धीला कौल दिला तर प्रापराध टळतो अन्यथा मनाने स्वतःचीच मनमानी केली तर प्रज्ञापराध घडतो आणि आपण चुकीचे काम करून बसतो.

मनाने बुद्धीचे ऐकावे यासाठी मनाला अनुशासनाच्या बेडीत अडकवणे भाग असते. याचसाठी आयुर्वेदाने सद्‌वृत्त सांगितले आहे. शरीराच्या आरोग्यासाठी स्वस्थवृत्त तर मनाच्या आरोग्यासाठी व संपन्नतेसाठी सद्‌वृत्त हवेच.

सद्‌वृत्तातील काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत –
-सकाळ संध्याकाळ स्नानसंध्या करावी.
-अग्नीची उपासना करावी.
-गुरु, आचार्य, सिद्ध यांची पूजा करावी.
-पाय स्वच्छ ठेवावेत.
-अपवित्र, अप्रशस्त वस्तूकडे पाहू नये.
-अन्नाची निंदा करू नये.
-निंद्य व्यक्‍तीचे म्हणजे चुकीची कामे करण्याऱ्या व्यक्‍तीचे अन्न खाऊ नये.
-रात्रीच्या वेळी दही खाऊ नये.
-शास्त्राने सांगितलेल्या, स्वतः केलेल्या किंवा एखाद्या संस्थेच्या नियमांचे उल्लंघन करू नये.
-रात्री भटकू नये.
-अनोळख्या ठिकाणी भटकू नये.
-सायंकाळी भोजन, शयन, अध्ययन व मैथुन करू नये.

अशा अनुशासनाने मनाला नियंत्रित केले तर त्यास चुकीचे निर्णय घेण्यापासून परावृत्त करता येते.

मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी दुसरी उपयुक्‍त योजना म्हणजे श्‍वासावर नियंत्रण.

“प्राणो येन बध्यते मनः तेनैव बध्यते’ असे शास्त्र सांगते. प्राण म्हणजे श्‍वास, श्‍वासावर नियंत्रण ठेवणाऱ्या ज्या सर्व क्रिया आहेत, त्यामुळे मनावरही नियंत्रण मिळवता येते. मनाचा व श्‍वासाचा संबंध आपण अनुभवतोच. मन अस्वस्थ असले की श्‍वसनाचा वेग वाढतो तर मन शांत असले की श्‍वसनही संथ होते. म्हणूनच दीर्घश्‍वसन हे मनःशांतीसाठी उत्तम असते. अनुलोम-विलोम, प्राणायाम, ॐकार गूंजन यांच्या नियमित अभ्यासाने हळूहळू मनाची ताकद वाढून संयमशक्‍ती वाढून मनावर नियंत्रण मिळवणे शक्‍य होते.

वाढत्या मानसिक ताणाला बळी पडायचे नसेल, प्रज्ञापराधापासून दूर राहून निरोगी दीर्घायुष्याचा लाभ घ्यायचा असेल तर रोज किमान २५-३० मिनिटे श्‍वासनियमन करायला हवे.

रज-तम हे मनाचे दोष वाढले की त्यातून मानसिक रोग निर्माण होतात. मानसिक रोग होण्याची शक्‍यता कोणामध्ये असते हे आयुर्वेदात याप्रमाणे सांगितले आहे,
-अतिशय भित्र्या स्वभावाच्या व्यक्‍ती
-शरीरात दोष वाढलेल्या व्यक्‍ती
-अनुचित आहार करणाऱ्या व्यक्‍ती
-अनुचित पद्धतीच्या शरीरक्रिया करणाऱ्या व्यक्‍ती
-अतिशय अशक्‍त व क्षीण व्यक्‍ती
-चंचल स्वभावाच्या व्यक्‍ती
-काम-क्रोध-लोभ वगैरे षड्रिपूंच्या आहारी जाणाऱ्या व्यक्‍ती
-बुद्धी विचलित झालेल्या व्यक्‍ती

मानस रोगांमध्ये शरीरशुद्धी सर्वप्रथम येते. शरीर शुद्ध झाले का मनही शांत व्हायला मदत मिळते.
हृदिन्द्रियशिरःकोष्ठे संशुद्धे वमनादिभिः ।
मनः प्रसादमाप्नोति स्मृतिं संज्ञां च विन्दति ।।
… चरक चिकित्सास्थान

विरेचनादी पंचकर्मांनी हृदय, इंद्रिये, शिर व शरीर उत्तम रीतीने शुद्ध झाले की मन प्रसन्न होते, स्मरणशक्‍तीही वाढते अर्थातच मानस रोग बरे होण्याची पूर्वतयारी होते.

मानसरोगांमध्ये जुने तूप, गोमूत्र, शतावरी-ब्राह्मी-जटामांसी वगैरे मन-बुद्धीची ताकद वाढविणारी द्रव्ये, जीवनीय औषधांसारखी एकंदर जीवनशक्‍ती वाढविणारी उपयुक्‍त द्रव्ये असतात. बरोबरीने विशिष्ट औषधीद्रव्य शरीरावर धारण करणे, यज्ञ-यागादी कर्मे करणे, धूप करणे, दान करणे यासारख्या ग्रहचिकित्सेतील उपायही योजायचे असतात.

मानसिक रोगाची भीती बाळगण्याची गरज कोणाला नसते? हे याप्रमाणे सांगितले आहे,

निवृत्तामिषमद्यो यो हिताशी प्रयतः शुचिः ।
… चरक चिकित्सास्थान

-जो मद्य व मांस सेवन करत नाही.
-जो प्रकृतीला अनुरूप हितकर आहार सेवन करतो.
-जो प्रत्येक कार्य सावधानपूर्वक करतो
-जो पवित्र व शुद्ध असतो.

तेव्हा या सर्व गोष्टींची काळजी घेतली, मन सैरभैर न सोडता अनुशासित केले, योग- प्राणायामादी क्रियांनी मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यातून शरीर व मन दोघांचेही आरोग्य अबाधित राहील व निरामय आयुष्याचा आनंद घेता येईल.

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: