Skip to content

प्रश्‍न न संपणारे!!

सप्टेंबर 12, 2008

प्रश्‍न न संपणारे!

आरोग्याबद्दलचे प्रश्‍न विचारताना आपण आपल्या सोयीचे उत्तर मिळण्याची वाट तर पाहत नाही ना, हे प्रत्येकाने तपासले पाहिजे. आरोग्य हीच जीवनातील महत्त्वाची संपत्ती. त्यासाठी प्रत्येकाने हवे तेवढे प्रश्‍न विचारून उत्तर मिळवावे; पण उत्तर मिळाल्यावर मात्र त्यानुसार शंभर टक्के आचरण करण्याची तयारीही हवी.
(बालाजी तांबे)
विक्रम वेताळाच्या गोष्टी आपणा सर्वांना परिचयाच्या आहेत. या गोष्टीतील पिशाचयोनीतील वेताळ झाडावर लटकत असे व प्रेत खांद्यावर घेऊन विक्रम निघाला, की तो त्याला अनेक प्रश्‍न विचारत असे. विचारलेल्या प्रश्‍नाचे त्याने उत्तर दिले नाही तर पंचाईत असे व तोंड उघडून उत्तर द्यावे तर वेताळ पुन्हा झाडावर लटकू लागे व विक्रमादित्याला पुन्हा जाऊन त्याला काढून आणावे लागत असे. म्हणजे, उत्तर दिले तरी पंचाईत व नाही दिले तरी पंचाईत, असे हे प्रश्‍न. म्हणून त्याला “यक्षप्रश्‍न’ म्हणायलाही हरकत नाही.

मला वाटते आरोग्याबाबतचे प्रश्‍न हे असेच न सुटणारे कोडे आहे. प्रश्‍न विचारीत असताना प्रत्येक जण स्वतःला सोयीचे उत्तर मिळण्याची वाट पाहतो. त्यामुळे दिलेल्या उत्तराने समाधान कधीच होत नाही. बऱ्याच वेळा रोग्याचे प्रश्‍न खूपच जास्त असतात आणि जणू प्रश्‍नाचे उत्तर मिळत नाही म्हणून रोग बरा होत नाही असाच त्याचा समज असतो. आरोग्य टिकविण्याच्या संबंधीही अनेक प्रश्‍न असतात. निरोगी राहावे किंवा बलवान व्हावे अशी इच्छा प्रत्येकालाच असते. त्यातूनही अनेक प्रश्‍न निर्माण होतात.

जीवन कशा तऱ्हेने जगल्यास निरोगी राहता येईल याचे विवेचन आयुर्वेदाने स्वस्थवृत्तात केले आहे; पण जीवनशैली बदलण्याचे हे मार्गदर्शन एकतर रुचत नाही किंवा रुचले तर आचरणात आणले जात नाही. सध्याच्या आधुनिक जीवनात हे कसे काय शक्‍य आहे हा एक नवा प्रश्‍न पुन्हा उत्पन्न होतो; पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे नैसर्गिक जीवनपद्धती ५०-६० वर्षांपूर्वीसुद्धा त्या वेळच्या जीवनपद्धतीला मानवत नव्हतीच. असे फार पूर्वीपासून चालत आलेले असावे. म्हणून आजारपणाची परंपरा वाढत वाढत सध्या मनुष्य इलाज पद्धतीच्या हाताबाहेर गेले असावेत, असे वाटणाऱ्या रोगांच्या चक्रात सापडलेला दिसतो.

आयुर्वेदिक जीवनपद्धती अवलंबण्यात काय अडचण असावी? असा प्रश्‍न विचारला, “तर त्यात फार काही अवघड नाही,’ असे उत्तर मिळते. सकाळी लवकर उठावे व सर्व नित्यकर्मे आटोपून कामाला लागावे. निसर्गाने हात दोन तर तोंड मात्र एकच दिलेले असताना, दोन हातांनी भरपूर कष्ट केले, तर एक तोंड भरण्यासाठी खरे पाहता अन्नाची कमतरता भासू नये. शेवटी अन्न शरीरासाठी आहे की नुसते आवडी-निवडी भागविण्यासाठी? पण मनुष्याला आहारासंबंधीचे मार्गदर्शन कधीच रुचलेले नाही. सेवन केलेल्या अन्नाचा परिणाम मनावर होतो; पण अन्न मनासाठी नसते ही गोष्ट मनुष्य कधीच लक्षात घेत नाही. नवीन नवीन कल्पना पुढे आल्या, ज्या प्रश्‍नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात; पण त्यात धंदा करणे हा हेतू मुख्यत्वे असावा ही शंका टाळता येत नाही.

त्यातून निघाल्या अनेक सूचना. यातूनच सकाळी नुसता फळांचा रस घेण्याचा किंवा नुसती फळे खाण्याचा सल्ला मिळतो, कोबीच्या पानावर दही टाकून खाण्याचा सल्ला मिळतो, दूध वा साखर न टाकता लिंबू पिळून चहा पिण्याचा सल्ला मिळतो किंवा सकाळी उठून कडुलिंबाच्या पानांचा रस पिण्याचा सल्ला मिळतो. काहीही ऐकून न घेणे हा तर मनाचा स्वभावच आहे. त्यामुळे प्रश्‍न विचारल्यावर उत्तर येण्यापूर्वीच मन दुसरीकडे पळत राहते. त्यामुळे दिलेले उत्तर ऐकायला प्रश्‍न विचारणाऱ्याचे मन जागेवर नसते.

अशा यक्षप्रश्‍नांना उत्तर देणारे अनेक जण पुढे सरसावतात व त्यातून प्रश्‍नोत्तरांचा सावळा गोंधळ सुरू होतो. एखाद्या प्रश्‍नाला हो किंवा नाही या दोन शब्दांत उत्तर दिल्याने होणारा गोंधळ वा विनोद सर्वांनाच परिचित असतो. बऱ्याच वेळा, विशेषतः एखाद्याला अडचणीत आणायचे असल्यास प्रश्‍नच असा विचारला जातो, की उत्तर देणाऱ्याला स्वतःच्या मनातील खरे उत्तर देताच येत नाही व भलत्याच दिशेने उत्तर द्यावे लागते. उदा. जेव्हा एखादा रुग्ण विचारतो, की कधी विशेष प्रसंगी थोडीशी दारू घ्यायला हरकत नाही ना? हे विशेष प्रसंग कुठले, तर प्रत्येक महिन्याची शेवटची तारीख, पहिली तारीख, शनिवार, रविवार, विशेष सुटी, कोणी पाहुणा घरी आला तर तो दिवस अशा रीतीने विशेष प्रसंग मोजल्यास जणू रोजच दारू घेण्याची परवानगी रोगी मागत असतो. “थोडीशी’ या शब्दाची तुलना एका बैठकीला पूर्ण बाटली पिणाऱ्यांबरोबर करायची, की काही विशेष माप ठरवायचे याविषयी डॉक्‍टरांचे मार्गदर्शन अपुरे पडू शकते. वैद्यकशास्त्राला धरून उत्तर मिळावे असा प्रश्‍न विचारला तरच रुग्णाला उपयोगी पडेल असे उत्तर मिळू शकते. प्रश्‍न विचारत असताना मिळालेल्या उत्तरानुसार आपल्याला आचरण ठेवायचे आहे, याची जबाबदारी घेतलेली नसली तर विचारलेल्या प्रश्‍नाला काहीच अर्थ राहात नाही.

एखाद्याने पत्रातून प्रश्‍न विचारलेला असतो व मी “फॅमिली डॉक्‍टर’चे सर्व अंक नियमित वाचतो, असेही त्या पत्रात लिहिलेले असते; पण गंमत म्हणजे त्याच दिवशीच्या “फॅमिली डॉक्‍टर’च्या अंकात तशाच प्रकारच्या प्रश्‍नाचे उत्तर दिलेले असते. त्या व्यक्‍तीला असे कळवले, की तुम्ही प्रश्‍न विचारला आहे, पण त्याच दिवशीच्या अंकात याच स्वरूपाच्या प्रश्‍नाचे उत्तर सविस्तरपणे आहे. तर त्यावर त्याचे उत्तर मिळते, की पण तो प्रश्‍न मी विचारलेला नव्हता; पण जर तशाच प्रश्‍नाचे उत्तर आपसूकच मिळालेले असले, तर त्यानुसार आचरण करायला काय हरकत आहे? “पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ ही म्हण कशासाठी आहे? तसेच दोन वर्षांपूर्वी अंकात एखाद्या प्रश्‍नाला उत्तर दिलेले असेल; पण त्या वेळी आपल्याला त्या प्रकारचा त्रास नसल्याने तसे आचरण करण्याची गरज नसेल; पण आज आपल्याला तसा त्रास होऊ लागल्यास त्या उत्तरानुसार आचरण करायला काहीच हरकत नाही. इतर सर्व विषयांवरचे प्रश्‍न विचारले वा न विचारले तरी एकवेळ चालेल; पण आरोग्याचे प्रश्‍न वेळेवर विचारावे, त्याचे उत्तर मिळवावे व त्यानुसार आचरण करावे. कारण, आरोग्य हेच सर्वांत महत्त्वाचे असते. आरोग्य हीच जीवनातील महत्त्वाची संपत्ती. त्यासाठी प्रत्येकाने पाहिजे तेवढे प्रश्‍न विचारून उत्तर मिळवावे; पण उत्तर मिळाल्यावर मात्र त्यानुसार शंभर टक्के आचरण करण्याची तयारी असावी.

वास्तुशास्त्रासंबंधी काही सूचना व मार्गदर्शन देण्याची काम मी पूर्वी करत असे. त्या वेळी मी सांगत असे व सध्याही सांगतो, की मार्गदर्शनानुसार तुम्ही सुधारणा केल्या नाहीत तर त्याचा दोष दुप्पट असतो. घरातील वास्तूचा जो काही दोष असेल तो तर होईलच; पण त्यावरचा इलाज कळलेला असून आपण त्यानुसार फेरबदल केले नाही याचे शल्य टोचत राहण्याचा दुसरा दोष तयार होतो. त्याचप्रमाणे अजाणतेपणी चुकून खाल्लेल्या वस्तूचा त्रास फक्‍त पोटाला होतो, मनाला होत नाही; पण खाऊ नये, असे डॉक्‍टरांनी सांगितल्यावर तीच गोष्ट खाल्ली तर पोटाला तर त्रास होतोच; पण मनाला माहीत असते, की आपण ही चूक करत आहोत व त्यामुळेही रोगाला आमंत्रण मिळते. तेव्हा आरोग्याचे प्रश्‍न अवश्‍य विचारावेत व त्यानुसार वर्तन ठेवले, त्यानुसार औषधयोजना केली, सांगितलेले पंचकर्मादी उपचार केले तर नक्कीच आरोग्य उत्तम राहून जीवन सुखमय होईल.

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: