Skip to content

बुद्धं शरणं गच्छामि

सप्टेंबर 9, 2008

बुद्धं शरणं गच्छामि

(डॉ. श्री बालाजी तांबे) नैसर्गिक नियमांना अनुसरून असलेला योग्य निर्णय अति जलद गतीने घेण्यासाठी आवश्‍यक शक्‍ती म्हणजे बुद्धी. बुद्धिवर्धनासाठी शरीराबरोबरच मेंदूचे आरोग्य, अनुभवाचे ज्ञान आणि संस्कार यांची आवश्‍यकता असते. अशी बुद्धी गणपतीकडे मागितली जाते. ……..दशावतारापैकी सध्याचे युग भगवान बुद्ध यांच्या अवताराचे युग आहे, याचा प्रत्यय ठायी ठायी येतो. सध्या बुद्धिमान माणसांची चलती आहे, असे आपल्याला दिसते. मात्र, सध्याचे युग हे कलियुग असल्यामुळे बुद्धी विधायक कार्यासाठी न वापरता निसर्ग, प्राणी व मनुष्याचे शोषण करण्यासाठी वापरली जात आहे, हे आजच्या काळाचे दुर्भाग्य. बुद्धीची वाढ होत असल्याचे तर दिसते; पण शारीरिक कष्टांची उपेक्षा करण्याचा भाव वाढत असल्यामुळे सध्या बुद्धिमान मनुष्यापुढे अनेक अडचणी उभ्या राहताना दिसतात. शरीराशिवाय मनुष्याचे अस्तित्व टिकू शकत नाही. मनुष्याची व्याख्या करायची म्हटल्यास मनाचा विकास व प्रकाश विशेषत्वाने जाणवेल अशा मर्यादेत पोचेल तो मनुष्य असे म्हणावे. म्हणूून “मन एव मनुष्याणाम्‌’ असे म्हणतात. चराचरातल्या सर्वांनाच मन असते म्हणजे मनुष्याला मन असते तसेच ते इतर प्राण्यांना व वनस्पतीलाही असते. परंतु, मनाचा विकास माणसाएवढा कोणाहीमध्ये झालेला दिसत नाही. महत्त्व कितीही असले तरी मनाचा उपयोग होण्यासाठी दोन गोष्टींची आवश्‍यकता असते. एक म्हणजे शरीर व शरीराबरोबरच आवश्‍यक असते बुद्धी. शरीर असते वाहनासारखे आणि बुद्धी असते सारथ्यासारखी. या दोन्ही गोष्टीत कुठल्याही प्रकारचा दोष आला तर त्यातून मनोदोष उत्पन्न होतो. कर्मयोगाचे महत्त्व ओळखून कष्ट केले नाहीत तर शरीराचे आरोग्य टिकत नाही. बुद्धीला व्यवस्थित प्रशिक्षण मिळालेले नसेल तर ती शरीर व मन या दोघांनाही कुठल्यातरी ठेचकाळणाऱ्या रस्त्यावरून नेऊन एखाद्या खड्ड्यात पाडते. बुद्धीला नेहमीच महत्त्व होते व राहीलही. महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचे सारथ्य केले व युद्धात विजय मिळाला. लढणार होते अर्जुन, भीम वगैरे पांडव, पण विजय मात्र झाला श्रीकृष्णांचा!! म्हणून शेवटी “यत्र योगेश्‍वरो कृष्णः’ असेच म्हटले गेले. सारथ्य म्हणजे मार्गदर्शन. बुद्धी एकूण जीवनव्यवहाराचे संपूर्ण मार्गदर्शन करून मनुष्याला यशाच्या शिखराकडे पोचवू शकते. या विश्‍वातील कुठल्याही गोष्टीची दोन स्वरूपे असतात. एक भौतिक मायेचे व दुसरे त्यातील शक्‍तिसंकल्पनेचे. म्हणून बुद्धीला कार्यरत ठेवण्यासाठी मेंदूचे आरोग्य खूप आवश्‍यक असते. मेंदूच्या भौतिक माध्यमातून बुद्धीचे कार्य चालते त्यातली शक्‍तिसंकल्पना मात्र संस्कार व प्रशिक्षण यांच्यामार्फतच तयार केली जाते. बुद्धी असा शब्दप्रयोग केला तरी त्यात स्मृती, धृती वगैरेंचा अंतर्भाव असतोच. संकल्पना समजण्यासाठी सर्व इंद्रियांची क्षमता आवश्‍यक असते. इंद्रियांचे आरोग्य व्यवस्थित नसेल तर मुळात विषय समजणारच नाही व त्याचे ज्ञान होणार नाही. एखादी गोष्ट दिसल्यावर वा ऐकल्यावर ती मेंदूत व्यवस्थित जागी ठेवल्यास हव्या त्या वेळी सापडेल किंवा त्या विभागातील किंवा परस्परसंबंधातील इतर वस्तूंबरोबर आवश्‍यकता वाटल्यास उपलब्ध होऊ शकेल. अशा अनेक गुणांनी संस्कारित करून माहिती साठवावी लागते व योग्य वेळी स्थळ व काळ यांचा विचार करून योजनेला अनुकूल अशी सर्व परिस्थिती पडताळून निर्णय घेण्याची आवश्‍यकता असते. खरे तर बुद्धी म्हणजेच निर्णय घेण्याची क्षमता. बुद्धिहीन मनुष्यही एखादा निर्णय चटकन घेईल. परंतु, त्या निर्णयानंतर इच्छित कार्य होणे अवघड होते व चटकन घेतलेला निर्णय अंगाशी येतो. भगवद्‌गीतेत अर्जुनाने म्हटलेले आहे, “कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताःयच्छ्रेयः स्यान्निश्‍चितं ब्रूहि तन्मेशिष्यस्ते।हं शाघि मां त्वां प्रपन्नम्‌।’ म्हणजे हे भगवंता, निसर्गाला, उत्क्रांतीच्या एकूण प्रक्रियेला व यशाला अनुकूल निर्णय घेण्यास मी असमर्थ आहे. माझी मूढावस्था निर्माण झालेली आहे. तेव्हा, मला तू संस्कार दे. “शाधि’ म्हणजे दीक्षा देणे व दीक्षेमध्ये नुसती माहिती वा वस्तू देणे अभिप्रेत नसून संस्कार देणे अभिप्रेत असते. बुद्धीसाठी संस्कारांची देणगी लागते. योग्यायोग्यतेचा निर्णय करणारी ती बुद्घी. एखादा निर्णय घेण्यापूर्वी मेंदूत खूप मोठी प्रक्रिया घडावी लागते. म्हणून मेंदूकडे सतत प्राणशक्‍तीचा पुरवठा होत राहावा व त्या ठिकाणी उष्णता तयार होणार नाही अशी खबरदारी घ्यावी लागते. इंद्रियांची साथ असली, शांतपणे अंतर्मुख होऊन विचार करण्याची सवय असली आणि यथायोग्य संस्कार मिळालेले असले तरच अचूक निर्णय घेता येतो व असा मनुष्य बुद्धिमान समजला जातो. अति जलद व योग्य निर्णय व तोही धर्माला म्हणजे नैसर्गिक स्वभावाला अनुसरून घेण्यासाठी आवश्‍यक शक्‍ती म्हणजे बुद्धी. इतर शारीरिक आरोग्याबरोबरच मेंदूचे आरोग्य, जीवनात जगताना मिळालेले अनुभवाचे ज्ञान व संस्कार बुद्धिवर्धनासाठी आवश्‍यक असतात. मनुष्याला पुन्हा बुद्धत्वाकडे जायचे असेल तर बुद्धीची उपासना करावीच लागेल. चांगली बुद्धी मिळावी अशी प्रार्थना बुद्धिदात्या गणपतीकडे केली जातेच. पण, नुसती प्रार्थना करून बुद्धी वाढेल असे नाही. त्यासाठी वाचन, सराव, प्रवास, यात्रा, अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, सणवार या सर्वांच्या माध्यमातून जीवनानुभव मिळविण्याचा प्रयत्न एका बाजूने करत असताना मेंदूला घातक ठरतील असे पदार्थ न खाणे, सिगारेट, मद्य किंवा अन्य ड्रग्जच्या सवयींपासून दूर राहणे, मेंदूला उपयुक्‍त असणाऱ्या रसायनांचे सेवन करणे आवश्‍यक असते. शेवटी स्वतःच स्वतःला समजून घ्यायचे असते. ज्यामुळे आत्मज्ञान होते ती खरी बुद्धी व आत्मज्ञान झालेले ते बुद्ध. म्हणून माणसे बुद्धीला व बुद्धांना शरण जातात. तर्कशास्त्राचा उपयोग करून, संख्याशास्त्राचा उपयोग करून मुख्यतः बौद्धिक पातळीवर संबंध ठेवून बुद्धी सहसा निर्णय घेत राहते, या कार्यात डाव्या बाजूच्या मेंदूची मदत होते. उजव्या बाजूचा मेंदू भावनात्मक, प्रेमाच्या ओलाव्यातून निर्णय घेत राहतो म्हणून खरे तर नुसत्या तर्कशुद्ध बुद्धीने निर्णय घेतला तर फारसा उपयोग होत नाही. भावनेची जोड मिळाली तरच ती बुद्धी पूर्ण स्वरूपात आहे असे म्हणता येते. माणसे भावनेने जोडली जातात. शेवटी माणसे जोडण्यावर जीवनाचे यश असल्यामुळे भावनिक संबंध महत्त्वाचे ठरतात. दोन्ही अंगांचा विचार करून जर निर्णय घेतला गेला, तर ती बुद्धी सर्वश्रेष्ठ असे म्हणायला हरकत नाही. भौतिक स्वार्थाच्या विचाराला धरून जाणारी बुद्धी कोणासही सुखी करू शकत नाही. अप्पलपोटेपणा करणारी दुर्बुद्धी तर आपलेपणा वाढविणारी सुबुद्धी. वस्तुनिष्ठ विचारांना भावनिक प्रेमाचा ओलावा असला तरच मनुष्य यशस्वी होऊन आनंद मिळवू शकतो. सुबुद्धी म्हणजेच संतुलित बुद्धी असणारा बुद्धिमान. – डॉ. श्री बालाजी तांबे http://www.ayu.de

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: