Skip to content

चिंता

ऑगस्ट 23, 2008

चिंता

(डॉ. श्री बालाजी तांबे)
चिंता हा एक मनोविकार आहे, असे आयुर्वेद म्हणतो. चिंता ही उन्माद, अपस्मारासारख्या मानसिक रोगांचे एक कारण असून अति चिंतेमुळे शरीरातील जलतत्त्वात बिघाड होतो, निद्रानाश होतो, निद्रानाशामुळे वात-पित्त हे दोन्ही दोष बिघडू शकतात. म्हणजेच चिंता ही अनेक प्रकारच्या असंतुलनाला कारणीभूत असते, असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे. ……..
चिंता हा शब्द आला आहे चिंतनावरून. चिंतन, म्हणजे विचार करणे हा मनाचा विषय असतो. म्हणूनच मनाला चित्त असेही म्हणतात.
कर्तव्यतया अकर्तव्यतया वा यन्मनसा चिन्त्यते तत्‌ मनोविषयः ।
… चरक शारीरस्थान

काय करावे व काय करू नये हे ठरविण्यासाठी मन चिंतन करीत असते. या चिंतनावर बुद्धी आपला निर्णय देते आणि मन या निर्णयाला अनुसरून किंवा डावलून इंद्रियांना काय करायचे ते सांगते.

चिंतनातून निर्णय घेतला गेला तर त्याप्रमाणे कार्य होते आणि त्या वेळेपुरते ते चिंतन, तो विषय संपतो. पण, जेव्हा कर्तव्य आणि अकर्तव्य म्हणजेच काय करावे व काय करू नये यांचे द्वंद्व सुरू राहते, त्यातून चिंतेचा उगम होतो. चिंता हा एक मनोविकार आहे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. तसेच, चिंता ही उन्माद, अपस्मारासारख्या मानसिक रोगांचे एक कारण सांगितले आहे. “चिन्त्यानां चातिचिन्तनात्‌’ म्हणजे अतिचिंतन करणे हे रसवह स्रोतस, पर्यायाने शरीरातील जलतत्त्व बिघडण्याचे एक कारण सांगितले आहे. चिंतेमुळे निद्रानाश होतो, निद्रानाशामुळे वात-पित्त हे दोन्ही दोष बिघडू शकतात. एकूणच चिंता ही अनेक प्रकारच्या असंतुलनाला कारणीभूत असते.

स्त्री काय किंवा पुुरुष काय दोघांनाही चिंता त्रासदायक असतेच. स्त्रियांमध्ये रसधातू हा एक महत्त्वाचा धातू असतो. स्त्रीचे स्त्रीत्व, तिचा नाजूकपणा, संवेदनशीलता, एवढेच नव्हे तर कांती, सतेजता हे सारे रसधातूवर अवलंबून असते.

चिंता रसधातूला सुकवते, शुक्रधातू अशक्‍त करते. स्त्रीच्या बाबतीत हे दोन्ही धातू कमकुवत झाले की गर्भाशय, बीजाशय वगैरे स्त्रीविशिष्ट अवयवांच्या कार्यात बिघाड होऊ शकतो. महिन्या-महिन्याला होणारा रजःस्राव हा रसधातूचा उपधातू असतो. म्हणजे पाळी नियमित येणे, व्यवस्थित येणे हे रसधातूवर अवंलबून असते असे आयुर्वेदाने सांगितले आहे. बाळंतपणानंतर स्तन्य येण्याची क्रियासुद्धा रसधातूवरच अवलंबून असते.

रसनिमित्तमेव स्थौल्यं कार्श्‍यं च ।
… सुश्रुत सूत्रस्थान

शरीराची स्थूलता किंवा कृशतासुद्धा रसधातूवरच अवलंबून असते. स्त्रीमध्ये जसा रसधातू महत्त्वाचा तसा पुरुषामध्ये शुक्रधातू महत्त्वाचा असतो. पौरुषत्व, संतती एवढेच नाही तर पुरुषाचे कर्तृत्व, धडाडी या गोष्टीही शुक्रधातूशी संबंधित असतात. स्त्रीमध्येही गर्भधारणा, गर्भपोषण व्यवस्थित होण्यासाठी शुक्रधातू योग्य असणे आवश्‍यक असते.

रसधातूचा संबंध हृदयाशीही असतो.
रसवहानां स्रोतसां हृदयं मूलं दश च धमन्यः ।
… चरक चिकित्सास्थान

चिंता झाली व रसवहस्रोतस बिघडले की त्याचा परिणाम म्हणून हृदय व धमन्यांमध्ये बिघाड होऊ शकतो. अति मानसिक ताण आला, खूप चिंता असली की हृद्रोग होतो हे आपण प्रत्यक्षातही अनुभवतो.

अशा प्रकारे चिंता शरीरात बरेच बिघाड करू शकते.

चिंता हा मनाचा विकार असल्याने चिंता दूर करायची असली तर मानसिक संतुलन प्रस्थापित करणे आवश्‍यक आहे. चिंता दूर करण्याचा एक उपाय म्हणून आयुर्वेदाने आश्‍वासन चिकित्सा सांगितली आहे.

आश्‍वासयेद्‌ सुहृद्वा तं वाक्‍यैर्धर्मार्थसंहितैः ।
… चरक चिकित्सास्थान

चिंताग्रस्त मनुष्याला जवळच्या व्यक्‍तीने धीर द्यावा, ज्याची चिंता आहे तो विषय व्यवस्थित मार्गी लागेल याचा विश्‍वास देण्याचा प्रयत्न करावा. त्याला काहीतरी अद्‌भुत दाखवून चिंतापूर्ण विषयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा.

एखाद्या कारणाने थोड्या वेळासाठी चिंताग्रस्त होणे वेगळे पण सतत चिंताग्रस्त राहणे हा एक मानसरोगच समजायला हवा. मनाचे चिंतनाचे काम बुद्धीच्या साहाय्याने एक निर्णयापर्यत पोचत नाही तोपर्यंत चिंता शरीर व मनाला पोखरत राहते. म्हणूनच रोग समजता येईल अशा चिंतेवर काम करण्यासाठी मन व बुद्धी या दोघांचीही शक्‍ती वाढवावी लागते. त्यासाठी मानसरोगातल्या उपचारांची मदत होऊ शकते.

यासाठी पुराणघृत म्हणजे दहा वर्षे जुने तूप चांगले असते. १०० वर्षांचे प्रपुराणघृत तर सर्व मानसरोगांवर उत्तम असते. असे घृत नुसते बघण्याने, स्पर्श करण्याने किंवा नस्य घेण्यानेही मानसरोग दूर होतात असे सांगितले आहे. याशिवाय पंचगव्य घृत, कल्याणक घृत ही सुद्धा चिंताग्रस्त मनुष्याला उपयुक्‍त ठरणारे असतात.

कल्याणक घृताच्या फलश्रुतीत सांगितले आहे,
भूतोपहतचित्तानां गद्‌गदानाम्‌ अचेतसाम्‌ ।।
… चरक चिकित्सास्थान

अदृश्‍य शक्‍तींनी ज्याचे चित्त बिघडले आहे, ज्याला स्पष्ट बोलता येत नाही व ज्याचे मन दुर्बल झाले आहे, त्याला कल्याणक घृताचा उपयोग होतो. “संतुलन ब्हमलीन घृत’, पंचगव्य घृतही मनाची, बुद्धीची शुद्धी करून मन-बुद्धीची ताकद वाढवणारे आहे.

घृतसेवनाप्रमाणेच मानसरोगात सांगितलेली धूपनचिकित्सा, अभ्यंग नस्य व मुख्य म्हणजे विशेष द्रव्ये शरीरावर धारण करणे, विशिष्ट नियम-व्रतांचे पालन करणे, सिद्ध औषधांचा प्रयोग करणे वगैरे उपायही मन-बुद्धीला ताकद देऊन चिंता दूर करण्यास मदत करू शकतात.

—————————————————–
आश्‍वासन चिकित्सा
चिंता हा मनाचा विकार असल्याने चिंता दूर करायची असली तर मानसिक संतुलन प्रस्थापित करणे आवश्‍यक आहे. चिंता दूर करण्याचा एक उपाय म्हणून आयुर्वेदाने आश्‍वासन चिकित्सा सांगितली आहे. चिंताग्रस्त मनुष्याला जवळच्या व्यक्‍तीने धीर द्यावा, ज्याची चिंता आहे तो विषय व्यवस्थित मार्गी लागेल याचा विश्‍वास देण्याचा प्रयत्न करावा. त्याला काहीतरी अद्‌भुत दाखवून चिंतापूर्ण विषयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा.
—————————————————–

– डॉ. श्री बालाजी तांबे

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: