Skip to content

पौष्टिक आणि मजेदार मुलांचा आहार

जून 27, 2008

पौष्टिक आणि मजेदार मुलांचा आहार

(डॉ. श्री बालाजी तांबे)
मुलांच्या रक्‍त, मांस, अस्थी आणि मज्जाधातूंचे पोषण व्यवस्थित होते आहे याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. संपूर्ण शरीराला प्राणशक्‍तीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी रक्‍तधातू, शरीर घडण्यासाठी आणि स्टॅमिना वाढविण्यासाठी मांसधातू, उंची वाढण्यासाठी, कणखरपणा येण्यासाठी अस्थिधातू आणि बौद्धिक क्षमता विकसित होण्यासाठी मज्जाधातू यांचे पोषण होणे गरजेचे असते. मुलांच्या एकंदर आहाराची योजना करताना, या साऱ्याचाच विचार करायला हवा. ……
“कौमारभृत्य’ हा आयुर्वेदाने लहान मुलांसाठी आखलेला खास विभाग! यात मुलांचे आरोग्य कसे राखावे याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. लहान मुलांचा आहार कसा असावा, येथपासून त्यांची खेळणी कशी असावी, कपडे कसे असावे, त्यांच्यावर कोणकोणते संस्कार करावेत, अशा अनेक विषयांची चर्चा या विभागात आहे.

लहान मुलांच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असते ते आहाराचे. लहान मुलांच्या बाबतीत आहाराची योजना अतिशय कुशलतेने करावी लागते कारण तो एका बाजूने पौष्टिक तर असायला हवाच पण दुसऱ्या बाजूने मुलांना आवडायलाही हवा.

सर्वसाधारणपणे चार-पाच वर्षांपर्यंत मुलांचे खाणे घरीच असते. मग मात्र शाळेला सुरुवात झाली की “डबा’ सुरू होतो. डबा आवडीचा नसला तर तसाच्या तसा परत येतो, असाही अनेक आयांचा अनुभव असतो. अर्थात आवडनिवड तयार होण्यामागे बऱ्याचशा प्रमाणात पालकच जबाबदार असतात. आतापर्यंतचा अनुभव आहे की “गर्भसंस्कार’ झालेल्या मुलांमध्ये खाण्या-पिण्याच्या तक्रारी वा अवाजवी आवडी-निवडी दिसत नाहीत. विशेषतः गर्भवती स्त्रीने गर्भारपणात जो काही आरोग्यदायी आहार घेतला असेल, ज्या पौष्टिक गोष्टी नियमितपणे खाल्ल्या असतील त्यांची आवड उपजतच मुलांमध्ये तयार झालेली असते. नंतरही मुलाला सहा महिन्यानंतर स्तन्याव्यतिरिक्‍त इतर अन्न देण्याची सुरुवात होते, त्यावेळेला मुलाची “चव’ तयार होत असते. तेव्हापासून मुलाला सकस, आरोग्यदायी अन्नाची सवय लावणे आपल्याच हातात असते. लहान मुलांचा शारीरिक, बौद्धिक विकास झपाट्याने होत असतो, विकासाच्या या वेगाला पोषक व परिपूर्ण आहाराची जोड असावीच लागते.

आयुर्वेदाच्या दृष्टीने सांगायचे झाले तर मुलांमध्ये रक्‍त, मांस, अस्थी आणि मज्जाधातूंचे पोषण व्यवस्थित होते आहे याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. संपूर्ण शरीराला, सर्व शरीरावयवांना प्राणशक्‍तीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी रक्‍तधातू महत्त्वाचा असतो. शरीर घडण्यासाठी, मूळ शरीरबांधा तयार होण्यासाठी व स्टॅमिना वाढविण्यासाठी मांसधातू आवश्‍यक असतो. उंची वाढण्यासाठी व कणखरपणा येण्यासाठी अस्थिधातू नीट तयार व्हावा लागतो आणि बौद्धिक क्षमता विकसित होण्यासाठी मज्जाधातूचे पोषण होणे गरजेचे असते. मुलांच्या एकंदर आहाराची योजना करताना तसेच डबा तयार करताना या साऱ्याचा विचार करायला हवा.

रक्‍तधातुपोषक – केशर, मनुका, सुके अंजीर, डाळिंब, काळे खजूर, काळे ऑलिव्ह, सफरचंद, पालक, गूळ

मांसधातुपोषक – दूध, लोणी, सुके अंजीर, खारीक; मूग, तूर डाळ; मूग, मूग, मटकी, मसूर, चणे वगैरे कडधान्ये

अस्थिधातुपोषक – दूध, गहू, खारीक, डिंक, खसखस, नाचणी सत्त्व

मज्जाधातुपोषक – पंचामृत, लोणी, तूप, बदाम, अक्रोड, जर्दाळू

याशिवाय, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी वगैरे तृणधान्ये; मूग, तूर, मसूर, चणा वगैरे कडधान्ये; द्राक्षे, शहाळी, ओला नारळ, गोड मोसंबी, पपई, आंबा वगैरे ऋतुनुसार उललब्ध असणारी ताजी व गोड फळे; ताज्या भाज्या; काकडी, गाजर वगैरे कोशिंबिरी; दूध, लोणी, तूप वगैरे स्निग्ध पदार्थ; मध वगैरे गोष्टी मुलांच्या आहारात असायला हव्यात.

मुले शारीरिक दृष्ट्या चपळ असतात. त्यांची सातत्याने काही तरी मस्ती, पळापळ चालू असते. म्हणूनच मुलांना दोन जेवणांव्यतिरिक्‍त काहीतरी खावेसे वाटणे साहजिक आहे. अर्थात एकसारखे “चरत’ राहण्याची सवय चांगली नसली, तरी भूक लागेल तेव्हा मुलांना काहीतरी चविष्ट सकस पदार्थ द्यायला हवेत. त्यादृष्टीने दाण्याची चिक्की, डाळीची चिक्की, गव्हाच्या पिठापासून बनविलेली सुकडी, खांडवी, राजगिऱ्याची वडी, तांदळाच्या पिठाची धिरडी, लाल भोपळ्याचे घारगे, थालिपीठ, फोडणीचा ताजा भात, वाफवलेल्या कडधान्यांची कोशिंबीर वगैरे पदार्थ देता येतात.

मुलांच्या आहारावर त्यांचा नुसता शारीरिकच नाही तर मानसिक व बौद्धिक विकासही अवलंबून असतो, त्यांच्यातील कल्पकता, सृजनता, चौकस वृत्तीला खतपाणी द्यायचे असेल तर संतुलित व परिपूर्ण आहाराचे योगदान महत्त्वाचे असते हे लक्षात घ्यायला हवे.

आजकाल बरीच मुले घरातल्या इतर व्यक्‍तींचे पाहून लहान वयातच चहा-कॉफी पिऊ लागतात. कोकोपासून बनविलेले चॉकलेट तर मुलांना फारच प्रिय असते. पण, हे तिन्ही पदार्थ मेंदूला उत्तेजना देणारे आहेत. चहा-कॉफी-चॉकलेट खाऊन उत्तेजित झालेल्या मेंदूमुळे एकाग्रता कमी होऊ शकते. त्यामुळे, शाळेतील मुलांना चॉकलेट अति प्रमाणात देऊ नये. त्याऐवजी सुका मेवा खाण्याची सवय लावावी. चहा-कॉफी ऐवजी शतावरी कल्प, “संतुलन चैतन्य कल्प’ टाकून कपभर दूध घेण्याची सवय असू द्यावी. दूध मेंदूसाठी, ज्ञानेंद्रियांसाठी उत्तम असते हे आयुर्वेदशास्त्राने सांगितले आहेच. आधुनिक संशोधनानुसारही मेंदूची व डोळ्यातील नेत्रपटलाची रचना योग्य होण्यासाठी टोरीन हे द्रव्य आवश्‍यक असते आणि ते दुधातून भरपूर प्रमाणात मिळू शकते, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लहान मुलांनी, शाळेत जाणाऱ्या मुलांनी नियमितपणे दूध अवश्‍य प्यायला हवे.

आजकाल हॉटेलमध्ये जाण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर मुले थंडगार आईस्क्रीमच वा सॉफ्ट ड्रिंकच मागतात, मग ऋतू कोणताही का असेना. किंवा चटक- मटक काहीतरी खाण्यासाठी डोसा, उत्तप्पा, वडा असे काहीतरी मागतात. एखाद वेळी या सर्व गोष्टी खाणे ठीक आहे. पण, मुलांच्या आरोग्याची काळजी न घेता प्रत्येक वेळी मुले मागतील ते सर्व देता येणार नाही. या वयात शरीराचे सातही धातू तयार होत असतात. त्यामुळे शरीरात वीर्यापर्यंत सर्व धातू व्यवस्थित तयार व्हावेत, ज्यांचा त्यांना पुढच्या सर्व आयुष्याला उपयोग होईल, असा पोषक आहार देणे आवश्‍यक आहे. लहानपणी कफदोष वाढणार नाही असा आहार मुलांना देणे आवश्‍यक असते.

शाळेत जाण्यापूर्वी मुलांना निदान पंचामृत, भिजवून सोलून बारीक केलेले तीन-चार बदाम, “संतुलन मॅरोसॅन’सारखे एखादे आयुर्वेदिक रसायन, तूप घालून खजूर दिला तर मुलांना काहीतरी पौष्टिक दिल्यासारखे होईल. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शाळेत मुलांना न्यहारी किंवा जेवण व्यवस्थित मिळणार नसले तर मुलांना केशर, बदाम, “संतुलन चैतन्य कल्प’, शतावरी कल्प वगैरे टाकून दोन वेळा दूध घेण्याची सवय लावावी. याने जेवणाचा होणारा दुराचार काही अंशी भरून निघेल. मुलांना शाळेतून आल्यावर मुगाचा लाडू, खोबऱ्याची वडी वगैरे दिल्यास रात्रीचे जेवण हलके ठेवता येईल.

मुलांना रात्रीचे जेवण लवकरच द्यावे म्हणजे लवकर झोपून मुले सकाळी लवकर उठू शकतील. त्यामुळे मुले वर्गात शिक्षकांनी शिकवलेला अभ्यासक्रम हिरिरीने शिकू शकतील.

डब्यामध्ये रोज रोज भाजी-पोळी न्यायला मुलांना आवडत नाही म्हणून मुलांना आवडेल व त्यांच्यासाठी पोषकही असेल असा डबा असायला हवा. बऱ्याच शाळांमध्ये पूर्ण दिवसामध्ये दोन सुट्ट्या असतात, एक छोटी तर दुसरी मोठी, दोन्ही सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिल्या तर मुलांनाही तेच तेच खाण्याचा कंटाळाही येत नाही. छोट्या डब्यामध्ये करंजी, खोबऱ्याची वडी, मुगाचा लाडू, मोदक, शिरा, साळीच्या लाह्यांचा चिवडा. फोडणीची पोळी अशा गोष्टी देता येतील.

वाढत्या वयाला पोषक ठरतील व डब्यातही नेता येतील अशा काही पाककृती येथे दिलेल्या आहेत. यापुढील अंकांतून अशा आणखी काही पाककृती आम्ही देऊ.

————————————————————–
मिश्र भाज्यांचा ठेपला
किसलेला दुधी/गाजर//पालक – २०० ग्रॅम, गव्हाचे पीठ – २५० ग्रॅम, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा तिखट – चवीनुसार, किसलेले आले – तीन ग्रॅम, दही- दोन ते तीन चमचे, तूप किंवा तेल – आवश्‍यकतेनुसार

वरील सर्व पदार्थ एकत्र करावेत त्यात हळद, हिंग, मीठ, साखर व कोथिंबीर टाकून, आवश्‍यकतेनुसार पाणी घालून, तेलाचा हात लावून मळून घ्यावे. थोड्याशा पिठावर ठेपले लाटून तूप टाकून सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.

हे ठेपले गरम गरम स्वादिष्ट लागतातच पण गार झाल्यावरही चांगले लागतात. हे ठेपले मुलांना घरच्या ताज्या लोण्याबरोबर किंवा दह्याबरोबर खायला देता येतात.

————————————————————–
मिश्र धान्यांचा लाडू
तांदूळ – २०० ग्रॅम, मुगाची डाळ – २०० ग्रॅम, गहू – २०० ग्रॅम, पिठी साखर – ७५० ग्रॅम, तूप – ५०० ग्रॅम, वेलची चूर्ण – सहा ग्रॅम, सर्व धान्ये स्वच्छ करून, धुवून, वाळवून घ्यावीत.

लोखंडाच्या कढईत सर्व धान्ये सोनेरी रंगावर भाजून घ्यावीत व गार झाल्यावर दळून (कणकेपेक्षा थोडे जाड) घ्यावी. सर्व पिठे एकत्र करावी.

जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून, त्यात पीठ घालावे व मंद आचेवर सुगंध येईपर्यंत भाजावे.

मिश्रण गार झाल्यावर त्यात पिठी साखर व वेलची चूर्ण मिसळून लाडू बांधावेत.
————————————————————–

– डॉ. श्री बालाजी तांबे

Advertisements
2 प्रतिक्रिया leave one →
  1. जून 3, 2011 6:15 सकाळी

    khup changalya tips

  2. tnsh permalink
    जून 27, 2011 2:35 pm

    mazi mulagi 1 varshachi ahe pan tikahihch khaat nahi mi s agale prakar karun baghitle pan tiche vagan vadh nahi please help kara

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: