Skip to content

विरुद्ध अन्नाचे प्रकार

मे 1, 2008

विरुद्ध अन्नाचे प्रकार

(डॉ. श्री बालाजी तांबे)
गुणांनी विरुद्ध असलेल्या अन्नाव्यतिरिक्त मात्राविरुद्ध, देशविरुद्ध, दोषविरुद्ध, कालविरुद्ध असे विरुद्ध अन्नाचे विविध प्रकार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत. ……..
आयुर्वेदाने सांगितलेली विरुद्ध अन्नाची संकल्पना पाहताना गुणांनी विरुद्ध पदार्थ एकत्र करून खाण्याने काय त्रास होऊ शकतात हे आपण मागच्या वेळेला पाहिले. त्याहीपलिकडे विरुद्ध अन्नाचे आणखी काही प्रकार आहेत.

संयोगविरुद्ध – संयोग झाल्यानंतर एकमेकांना विरुद्ध ठरणारे अन्न या प्रमाणे होय,
मध व तूप समान मात्रेत घेणे.
मधाचा उष्णतेशी संयोग करणे म्हणजे मध गरम करणे.
मध खाऊन वर लगेच गरम पाणी पिणे.
बिब्बा व गरम पाणी एकत्र घेणे.

देशविरुद्ध – ज्या देशात आपण राहतो, त्या देशाला अनुरूप खाणे असावे. देशाविरुद्ध आहारही विरुद्ध अन्नात मोडतो. उदा. वाळवंट, कोरड्या हवेचे प्रदेश वगैरे वाताचे आधिक्‍य असणाऱ्या ठिकाणी वातशामक अन्न सेवन करण्याची तर कफप्रधान प्रदेशात, पाऊस पाणी भरपूर असणाऱ्या प्रदेशात कफशामक अन्न सेवन करण्याची आवश्‍यकता असते. या उलट म्हणजे कोरड्या हवेत रुक्ष, तीक्ष्ण अन्न सेवन करणे; दमट हवेत तेलकट, थंड अन्न सेवन करणे हे विरुद्ध अन्नात मोडते.

गुजरात, राजस्थान या कोरड्या हवेत खाल्ले जाणारे पदार्थ, मुंबईसारख्या दमट हवेत खाणे योग्य नव्हे किंवा दक्षिण भारतात खाल्ले जाणारे आंबवलेले पदार्थ महाराष्ट्रात सर्रास खाणे योग्य नव्हे. चीजसारखी पचायला जड वस्तू थंड प्रदेशात पचवता आली तरी भारतासारख्या उष्ण कटिबंधाच्या देशात सातत्याने खाणे अयोग्यच होय.

काळविरुद्ध – जे हवामान, जो ऋतू सुरू आहे त्याला अनुकूल काय, प्रतिकूल काय याचा विचार न करता घेतलेला आहार काळविरुद्ध समजला जातो. उदा. पावसाळ्यात पचायला हलके, ताजे व वातशामक म्हणजे मधुर, आंबट, खारट चवीचे अन्न खाण्यास योग्य असते. त्याऐवजी पचायला जड, रुक्ष असे वातवर्धक अन्न खाणे कालविरुद्ध होय. शरद ऋतूत पित्त वाढलेले असताना तिखट, आंबट, तीक्ष्ण पदार्थ सेवन करणे कालविरुद्ध होय.

अग्निविरुद्ध – आयुर्वेदाने आहार अग्निसापेक्ष, भूकसापेक्ष असावा असेही आवर्जून सांगितले आहे. मंद अग्नी असणाऱ्यांनी कमी प्रमाणात व पचायला हलके अन्न खाणे योग्य असते, तर तीक्ष्ण अग्नी असणाऱ्यांना जेव्हा जेव्हा व जितकी भूक लागेल तेवढे अन्न खाणे गरजेचे असते. हा विचार बाजूला ठेवून मोजून मापून जेवणे, नियमपूर्वक ठरवून जेवणे किंवा भूक नसतानाही भरपूर खाणे हे अग्निविरुद्ध आहे.

मात्राविरुद्ध – मध व तूप समप्रमाणात एकत्र करून खाणे हे मात्रेमुळे विरुद्ध असते. या ठिकाणी मध व तूप औषधासह थोड्या प्रमाणात घ्यायचे असतानाही विषम प्रमाणात (कमी जास्ती प्रमाणात) घ्यायला पाहिजे असा अर्थ घ्यायची आवश्‍यकता नाही. उदा. सितोपलादी चूर्ण मध-तुपासह चाटायचे असते त्या वेळी मध व तूप अर्धा अर्धा चमचा घेण्याने विरुद्ध होत नाही, परंतु नुसते मध व तूप भोजन स्वरूपात म्हणजे मोठ्या प्रमाणात खायचे असेल तर ते समान मात्रेत नसावे.

मध, तूप, पाणी, तेल, वसा (प्राण्याच्या मांसातून निघालेला स्निग्धांश) एकत्र करून पिणे विरुद्ध होय. म्हणजे मध, तूप व पाणी एकत्र करून पिणे वा तेल, तूप, मध व पाणी एकत्र करून पिणे विरुद्धान्न होय. रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे पचायला जड समजले जाते परंतु एखाद्याला वर्षानुवर्षे रात्री दूध प्यायची सवय असली व त्यामुळे त्रास होत नसला तर ती सवय मोडणे “सात्म्यविरुद्ध’ ठरेल.

दोषविरुद्ध – आयुर्वेदाने वातदोषाला काय अनुकूल, पित्तदोषासाठी काय हितकर, कफदोष असताना काय योग्य याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. निरोगी व्यक्‍तीने आपल्या प्रकृतीनुसार प्रमुख दोषाला काय अनुरूप आहे याचा विचार करायला हवा. तर रोगी व्यक्‍तीने वा असंतुलन झालेल्या व्यक्‍तीने असंतुलित दोषानुसार काय खावे, काय करावे, काय करणे टाळावे याचा विचार करायला हवा. हे जेव्हा केले जात नाही तेव्हा ते दोषविरुद्ध समजले जाते. उदा. वातप्रकृतीच्या व्यक्‍तीने पावटा, मटार, चवळी, चुरमुरे वगैरे खाणे, अतिप्रवास करणे दोषविरुद्ध होय.

पित्तप्रकृतीच्या किंवा पित्ताचा त्रास होणाऱ्या व्यक्‍तीने ढोबळी मिरची, वांगे, अतिप्रमाणात तिखट, तेलकट अन्न खाणे, रात्री जागणे दोषविरुद्ध होय. कफप्रकृतीच्या किंवा कफविकार झालेल्या व्यक्‍तीने श्रीखंड, चीज, मिठाया खाणे, दुपारचे झोपणे हेही दोषविरुद्ध होय.

याशिवाय संस्काराविरुद्ध, विधिविरुद्ध वगैरे विरुद्ध अन्नाची आणखी काही उदाहरणे आयुर्वेदाने सांगितलेली आहेत.

– डॉ. श्री बालाजी तांबे

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: