Skip to content

स्तंभन, संतर्पण आणि अपतर्पण

एप्रिल 15, 2008

स्तंभन, संतर्पण आणि अपतर्पण

(डॉ. श्री बालाजी तांबे)
शरीराला शीतलता प्रदान करणारी स्तंभन उपचारपद्धती सहा उपचारपद्धतींच्या गटात सर्वांत शेवटी येते. या सहा उपचारपद्धती शरीरधातूंचे पोषण करणाऱ्या आणि पोषण न करणाऱ्या – म्हणजेच संतर्पण आणि अपतर्पण – अशा दोन गटांत विभागल्या गेलेल्या आहेत. …….
सहा मुख्य उपचारांमधील शेवटचा उपचार आहे स्तंभन. हा स्वेदनाच्या विरुद्ध गुणाचा असतो. म्हणजे स्वेदनामुळे घाम येतो, उष्णता निर्माण होते, त्या उलट स्तंभनामुळे शीतलता उत्पन्न होते, अतिरिक्‍त द्रवता कमी होते.

स्तंभनाची आवश्‍यकता कोणाला असते हे चरक संहितेमध्ये या प्रकारे सांगितलेले आहे,
पित्तक्षाराग्निदग्धा ये वम्यतीसारपीडिताः ।
विषस्वेदातियोगार्ताः स्तंभनीया निदर्शिताः ।।
… चरक सूत्रस्थान

पित्त प्रकृती असल्यास, क्षारप्रयोग वा अग्निकर्म अधिक प्रमाणात झाल्यास, उलट्या अथवा जुलाब होत असल्यास, शरीरातील विषद्रव्ये अतिवेगाने बाहेर पडत असल्यास, घाम अति प्रमाणात येत असल्यास स्तंभन उपचार करणे आवश्‍यक असते.

सामान्यतः मधुर, कडू, तुरट चवीच्या व शीत वीर्याच्या गोष्टी स्तंभन करणाऱ्या असतात, उदा. लाह्या, आवळा, नागरमोथा, जांभूळ वगैरे. अशा प्रकारे आयुर्वेदात लंघनापासून स्तंभनापर्यंत सहा प्रकारचे उपचार सांगितलेले आहेत. जो रुग्णाच्या स्थितीनुसार, रोगानुसार या सहाही उपचारांची योग्य योजना करू शकतो, तोच श्रेष्ठ वैद्य होय, असेही चरकाचार्य म्हणतात. या सहा उपचारांचे दोन गटात वर्गीकरण करता येते. “संतर्पण’ करणारे व “अपतर्पण’ करणारे. संतर्पण म्हणजे शरीरधातूंचे पोषण करणे, शरीराला सुख देणे, तृप्ती करणे. एका नियत प्रमाणापर्यंत संतर्पणाची आवश्‍यकता प्रत्येकालाच असते. शरीराची ताकद वाढविण्यासाठी, धातूंना बलवान बनविण्यासाठी संतर्पण अत्यावश्‍यक असते. बृंहण, स्नेहन व स्तंभन हे तीन उपचार संतर्पण गटात बसतात. परंतु, या उपचारांचे फायदे मिळण्यासाठी, खऱ्या अर्थाने संतर्पण होण्यासाठी ते योग्य तऱ्हेने, यथोचित प्रमाणात करणेही तेवढेच आवश्‍यक असते. अन्यथा संतर्पणजन्य रोग निर्माण होतात. आयुर्वेदात संतर्पणजन्य रोगाची कारणे पुढीलप्रमाणे दिलेली आहेत.

स्निग्ध, पचायला जड, कफवर्धक अन्न, मिठाया अति प्रमाणात खाणे.
नवीन (एक वर्ष न झालेले) धान्य, नवीन मद्याचे सेवन करणे.
दूध, तूप, गुळापासून बनविलेल्या पदार्थांचे अति प्रमाणात सेवन करणे.
पिष्टमय पदार्थ अति प्रमाणात खाणे.
शारीरिक श्रम, व्यायाम वगैरे न करणे.
दिवसा झोपणे किंवा दिवसभर आरामात बसून राहणे.

या कारणांमुळे संतर्पणाचा अतिरेक होऊन संतर्पणजन्य रोग निर्माण होतात.

संतर्पणजन्य रोग याप्रमाणे होत. प्रमेह, कोठ (अंगावर गांधीप्रमाणे चकत्या उठणे), कंडू (खाज सुटणे), पाण्डुरोग (शरीर निस्तेज होणे), त्वचारोग, आमदोष, लघवी अडखळत होणे, जेवणात रुची नसणे, डोळ्यांवर झापड येणे, मैथुनसामर्थ्य नष्ट होणे, अतिस्थूलता, आळस, अंग जड होणे, इंद्रिये जडावणे, बुद्धी जड होणे, सदैव चिंताग्रस्त राहणे, अंगावर सूज येणे वगैरे.

संतर्पणाच्या विरुद्ध असते अपतर्पण. त्यामुळे संतर्पणजन्य रोगांवर उपचार म्हणून अपतर्पण करता येते. अपतर्पणामध्ये लंघन, रूक्षण, स्वेदन या तीन उपचारांचा समावेश होतो.

शरीरधातूंची अवाजवी प्रमाणात झालेली वाढ कमी करण्यासाठी, अनावश्‍यक कफदोष, मेद, आळस झडण्यासाठी अपतर्पणाची गरज असली तरी ते प्रमाणापेक्षा अधिक होऊन चालत नाही. वजन वाढू नये यासाठी किंवा वाढलेला मेद कमी व्हावा यासाठी शरीरपोषक द्रव्यांचे अजिबात सेवन न करण्याने, मेद झडून जाण्यासाठी रुक्ष, उष्ण द्रव्यांचे, औषधांचे अतिसेवन करण्याने अपतर्पण होताना दिसते. रक्‍तातील कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइड्‌स प्रमाणापेक्षा वाढू नये यासाठी गोळ्या घेत राहण्यानेही हळूहळू अपतर्पणाची लक्षणे दिसू लागतात.

आयुर्वेदात अपतर्पणजन्य रोग या प्रमाणे सांगितलेले आहेत,
शरीर तसेच जाठराग्नीची ताकद कमी होणे.
त्वचेची कांती, ओज, शुक्रधातू, मांसधातू यांचा क्षय होणे.
ताप, बरगड्यांमध्ये वेदना, अरुची, श्रवणशक्‍ती कमी होणे, मनोभ्रम, प्रलाप, हृद्रोग, मल-मूत्राचा अवरोध, शरीरात वेदना, संधिशूळ, विविध वातरोग उत्पन्न होणे.

ज्या प्रमाणे संतर्पणजन्य रोगांवर अपतर्पण उपचार करायचे असतात, तसेच अपतर्पणजन्य रोगांवर संतर्पण उपचार करायचे असतात.
या उपचारांची थोडक्‍यात माहिती आपण पुढच्या वेळेला पाहू.

– डॉ. श्री बालाजी तांबे

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: